पोलिसांची भूमिका संशयास्पद : पीडित मुलगी, नातेवाईकांसह महिलांचा आरोपगडचिरोली : अहेरी तालुक्यातील महागाव येथील एका २३ वर्षीय दलित मुलीचे शारीरिक शोषण करणारा एसपीओ असलेला आरोपी तिरूपती पोचम पानेम याचेवर तक्रारीनुसार अहेरी पोलिसांनी बलात्कार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी आरोपी युवकाच्या नातेवाईकांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी युवकासह सारेच आरोपी मोकाट आहेत. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद असून सदर प्रकरण पोलीस दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप पीडित मुलगी व अहेरीतील महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेतून केला.यावेळी अहेरी पोलीस ठाण्याच्या महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्य शेख रहिमा सिद्धीकी अहेमद, मालू रामा इष्टाम व पौर्णिमा इष्टाम उपस्थित होत्या. महागावातील गणेश पानेम, मारोती करमे व शंकर टेकुल यांच्यासह आरोपीचे नातेवाईक यांनी मला व माझ्या आईला जातीवाचक शिवीगाळ केली, अशी माहिती पीडित मुलीने यावेळी दिली. तंमुस सदस्य शरद कुंभारे व मारोती करमे यांनी युवक तिरूपती पानेम व माझ्या संभाषणाचे माझ्या मोबाईलमधील रेकॉर्ड व संदेश नष्ट करून पुरावा मिटविण्याचा प्रयत्न केला, असेही पीडित मुलीने यावेळी सांगितले. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी लक्ष देऊन पीडित मुलीला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. (प्रतिनिधी)
मुलीचे शारीरिक शोषण करणारा आरोपी मोकाट
By admin | Published: February 06, 2016 1:30 AM