गडचिरोली पोलीस ठाण्यामधील घटना : पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : दारू विक्रीच्या प्रकरणातील आरोपीने स्वत:च्या पोटात शीतपेयाची बॉटल खुपसल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गडचिरोली पोलीस स्टेशनमधील पोलीस कोठडीमध्ये घडली आहे. यातील आरोपीची प्रकृती गंभीर आहे. या घटनेबाबत पोलिसांच्या कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. विनोद खुशाल खेवले (३२) रा. गोगाव ता. गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे. विनोद खेवले याला गडचिरोली पोलिसांनी शुक्रवारी दारूची वाहतूक करताना अटक केली. तेव्हापासून तो सोमवारपर्यंत पोलीस कोठडीमध्येच होता. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्याने स्वत:च्या पोटात शीतपेयाची काचेची बॉटल खुपसली, अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. तर पोलिसांनीच विनोदच्या पोटात बॉटल खुपसली, असा आरोप विनोदचा नातेवाईक महेंद्र देवराम सिडाम व मित्र पत्रू विठ्ठल बाबणवाडे यांनी केला आहे. घटनेनंतर काही कालावधीपर्यंत तो शुध्दीवर होता. त्यावेळी त्याने दोन पोलिसांनी आपल्याला धरून ठेवले व एका पोलिसाने काचेची बॉटल पोटात खुपसली, अशी माहिती दिली असल्याचे महेंद्र सिडाम आणि पत्रू बाबणवाडे यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. विनोदच्या पोटाला सात टाके बसले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी मात्र विनोदने स्वत:हूनच बॉटल खुपसली असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करून दोषी पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे. अन्यथा पोलीस मुख्यालयासमोरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नातेवाईकांनी दिला आहे.
कोठडीतील आरोपीने पोटात बाटली खुपसली
By admin | Published: July 12, 2017 1:33 AM