लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी ‘ब्रेथ ॲनालायझर’चा वापर करण्यास शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे वाहतूक पाेलिसांकडील ब्रेथ ॲनालायझर धूळखात पडले आहेत. परिणामी, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ड्रंक ॲण्ड ड्राइव्हच्या कारवाया कमी झाल्या आहेत. जिल्हाभरात गेल्या दाेन वर्षांत केवळ १०८ मद्यपी वाहनचालकांवरच पाेलीस विभागाने दंडात्मक कारवाई केली.
सन २०१९ मध्ये ड्रंक ॲण्ड ड्राइव्हच्या जिल्हाभरात ८४, तर सन २०२० मध्ये केवळ २४ कारवाया करण्यात आल्या. मार्च महिन्यात काेेराेनाचा रुग्ण आढळून येताच देशात लाॅकडाऊन सुरू करण्यात आले. दरम्यान, ब्रेथ ॲनालयझरद्वारे काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये, यासाठी त्याचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली. ही बंदी अद्यापही हटविण्यात आली नाही.
मद्य प्राशन करून दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालविणे हे कायद्याने गुुन्हा आहे. मद्य प्राशन करून वाहन चालविताना स्वत:साेबतच रस्त्यावरून चालणाऱ्या इतरांचाही जीव धाेक्यात घालणाऱ्या तळीरामांना काेराेनामुळे माेकाट रान मिळाले आहे. काेराेनाच्या संसर्गामुळे मद्यपी वाहनचालकांची तपासणी करायची नाही. त्यांना ब्रेथ ॲनालायझर लावायचा नाही, असे शासनाने म्हटले आहे. त्यामुळे वर्षभरापासून तळीरामांना ना दंड केला जातो, ना कुठलीही कारवाई केली जाते. त्यामुळे तळीराम आपल्याच धुंदीत वावरत आहेत. पाेलिसांकडून कारवाई हाेण्याची अपेक्षा आहे.
बाॅक्स...
बंदीतही दारू मुबलक
गडचिराेली जिल्ह्यात कायद्याने दारूबंदी आहे. शिवाय शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१४ पासून दारूबंदी करण्यात आली. कायद्याने दारूबंदी असली तरी गडचिराेली जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात दारूची अवैधरीत्या माेठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. दारू पिऊन काही चालक दुचाकी व चारचाकी वाहन चालवीत आहेत. मात्र, काेराेना काळात ब्रेथ ॲनालायझरचा वापर हाेत नसल्याने या मद्यपी वाहनचालकांचे चांगलेच फावले आहे. मद्यपी वाहनचालकांची तपासणी हाेत नसल्याने जिल्ह्यात गेल्या पाच-सहा महिन्यांत अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. शासनाने ब्रेथ ॲनालायझरचा वापर करण्यास पाेलिसांना परवानगी देण्याची गरज आहे. जेणेकरून धडक कारवाईला वेग येईल.
बाॅक्स...
२ लाख ९४ हजारांचा दंड वसूल
दारू पिऊन दुचाकी व चारचाकी वाहन चालविणाऱ्या चालकांविराेधात पाेलीस प्रशासनाच्या वतीने कायद्याने कारवाई केली जाते. सन २०१९ मध्ये तळीराम वाहनचालकांकडून १ लाख ५५ हजार २०० रुपये, तर सन २०२० मध्ये १ लाख ३९ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला. दाेेन वर्षांत मिळून एकूण २ लाख ९४ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
काेट...
माेटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अन्वये दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाते. गडचिराेली शहर वाहतूक शाखेकडे चार ब्रेथ ॲनालायझर मशीन आहेत. या मशीनच्या साहाय्याने मद्यपी वाहनचालकांची तपासणी करून कायद्यान्वये कारवाई केली जाते. काेराेना संसर्गामुळे मार्च २०२० अखेरीसपासून ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंद आहे. शासन व वरिष्ठांकडून आदेश मिळाल्यावर वापर करू.
-पूनम गाेरे, प्रभारी, वाहतूक शाखा, गडचिराेली