जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : नागरिकांकडून ज्यादा पैसे आकारत असल्याच्या तक्रारी लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : महाआॅनलाईन केंद्र चालकांनी अर्ज तयार करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिकचे पैसे घेतल्यास व याबाबतची तक्रार आपल्याकडे प्राप्त झाल्यास संबंधित महाआॅनलाईन केंद्र चालकाची चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित केंद्र चालकाचा परवाना रद्द करण्यात येईल, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी केंद्र चालकांना दिले आहेत. महाआॅनलाईन केंद्र चालकांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विपीन इटनकर, महाआॅनलाईन लिमिटेड नागपूर विभागाचे व्यवस्थापक शहजाद शेख, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते. सेवा हक्क अधिनियमांतर्गत १७ प्रकारच्या सेवा आणि प्रमाणपत्र या केंद्रातून देण्यात येतात. महाआॅनलाईन केंद्र चालकाने शासनाने ठरवून दिलेले दरच नागरिकाकडून आकारणे आवश्यक आहे. प्रत्येक दाखल्यासाठी आकारावयाच्या दराचा तक्ता महाआॅनलाईन केंद्राच्या दर्शनी भागावात लावावा, शासकीय दरापेक्षा अधिकचा दर घेऊ नयेत, मोबाईलद्वारे पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, केंद्रचालकाच्या बँक शाखेची संपूर्ण माहिती केंद्रामध्ये लावावी, असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिले आहेत.
तर महाआॅनलाईन केंद्रांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2017 1:04 AM