उघड्यावर शौचास बसले : गडचिरोली नगर परिषदेची धडक मोहीम सुरू गडचिरोली : नगर परिषदेने उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई करण्याची मोहीम बुधवारपासून हाती घेतली आहे. बुधवारी १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर गुरूवारी आणखी १२ व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले आहेत. शहरांमध्ये स्वच्छता राहावी यासाठी शहरातील ज्या नागरिकाकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही. अशा नागरिकांना शौचालय बांधकामासाठी १६ हजार रूपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले आहे. राज्य शासनाने १ मे पर्यंत गोदरीमुक्त शहर करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. अन्यथा संपूर्ण योजनांचे अनुदान रोखण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार गडचिरोली नगर परिषदेने शहर गोदरीमुक्त करण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. या अंतर्गत बुधवारपासून कडक कारवाई करणे सुरू झाले आहे. नगर परिषदेने दोन गुड मॉर्निंग पथके तयार केली आहेत. सदर पथके ज्या भागात उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्या भागात सकाळच्या सुमारास पहारा ठेवतात. लोटा धरून बाहेर शौचस जात असलेल्या व्यक्तीला पकडून त्याच्यावर कारवाई केली जात आहे. गुरूवारी विसापूर वार्ड, लांजेडा, इंदिरा नगर व विवेकानंद नगरातील १२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर नगर पालिका अधिनियम २३०, २३१, बॉम्बे मुन्सीपल प्रोव्हेन्सीअल अॅक्ट १९५० सेक्शन १५, ११७ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. गुरूवारच्या गुड मॉर्निंग पथकात मुख्याधिकारी क्रिष्णा निपाने, कनिष्ठ अभियंता मैंद, दुधबळे, अभियंता शेंडे यांच्यासह पोलीस व होमगार्ड यांचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)
आणखी १२ जणांवर झाली कारवाई
By admin | Published: March 17, 2017 1:17 AM