अवैध रेती उपसा प्रकरण : तहसीलदारांनी ठोठावला दंडभामरागड : भामरागड गावाला इंद्रावती, पामुलगौतम, पर्लकोटा नद्यांचा वेढा आहे. या नद्यांच्या पात्रातून मागील अनेक दिवसांपासून रेतीचा अवैध उपसा होत असल्याच्या तक्रारी तहसीलदार अरूण येरचे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार त्यांनी येथील दोन ट्रॅक्टर मालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून १० हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. भामरागड येथील बडगे व मुकेश हे दोन ट्रॅक्टरचालक एका खासगी संस्थेला अवैधरित्या रेतीचा पुरवठा करीत होते. याची माहिती तहसीलदारांना मिळाल्यावर तहसीलदारांनी या प्रकरणी कारवाई करून त्यांच्यावर दंड आकारला. यापूर्वीही भामरागड येथे मोठ्या प्रमाणावर रेतीचे उत्खनन विना रॉयल्टी सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी वृत्तपत्रातून बातम्या आल्यानंतर महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कारवाई केली. पर्लकोटा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर रेती उपसा केला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
भामरागड येथे दोन ट्रॅक्टरवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2016 1:27 AM