लोकमत न्यूज नेटवर्कलखमापूर बोरी/गडचिरोली : १६ जुलै रोजी चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात मुसळधार पाऊस झाला. त्यावेळी पूर परिस्थितीमुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. मात्र त्यानंतर तब्बल २० दिवसांचा कालावधी उलटूनही पाऊस झाला नाही. मधात दोनदा अल्पसा पाऊस झाला. त्यानंतर पावसाने कायमची दांडी मारली. परिणामी आता शेतजमिनी कोरड्या पडल्या आहेत. पावसाअभावी जिल्हाभरातील ३० टक्के रोवणीचे काम शिल्लक असून सध्या अनेक ठिकाणच्या रोवणीचे काम थांबले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाचे उत्पादन घेतले जाते. ७० टक्के जनतेचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील लोकांचे वार्षिक अंदाजपत्रक शेती व्यवसायावर अवलंबून असते. १६ जुलैला झालेल्या दमदार पावसानंतर जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धानपीक रोवणीच्या कामास वेग आला. १० दिवस रोवणीचे काम चांगल्या पद्धतीने झाले. त्यानंतर शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई भासू लागली. ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे, सिंचन विहीर, कृषिपंप आदी साधने आहेत, अशा शेतकऱ्यांनी मोटारपंपच्या सहाय्याने आपल्या शेतजमिनीत रोवणीचे काम कसेबसे केले. आज किंवा उद्या पाऊस होईल, अशी आशा शेतकऱ्यांच्या मनात घर करून होती. मात्र गेल्या १० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. जिल्ह्यातील काही सदन शेतकऱ्यांनी शेतीलगतच्या तलाव, बोड्यात मोटारपंप लावून शेतजमिनीला पाणी केले. दरम्यान आठवडाभर डिझेल इंजिन व मोटार पंपचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. मात्र आता पाणीस्त्रोतही कोरडे झाल्याने शेतकऱ्यांपुढे कोणताही पर्याय उरला नाही.कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडा- लखमापूरवासीयांची हाकचामोर्शी तालुक्याच्या लखमापूर बोरी परिसरात धानपीक रोवणीचे काम ७० टक्के झाले आहे. ३० टक्के रोवणीचे काम होण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे पाऊस येण्याची शक्यता दिसून येत नाही. त्यामुळे धानपीक रोवणीचे काम पूर्ण होण्यासाठी रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी कालव्याद्वारे लखमापूर परिसरात सोडण्यात यावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. यापूर्वीच्या पावसाने धान पऱ्हे वाढले. मात्र आता पऱ्ह्यांना पाणी नाही. त्यामुळे खोदलेल्या पेंढ्या वाळलेल्या स्थितीत दिसून येत आहेत. १० ते १५ आॅगस्टपर्यंत पाऊस न झाल्यास केलेली रोवणी व पऱ्हे करपण्याची शक्यता नाकारता येत नाही.रोगाचा प्रादुर्भाव बळावणारउष्णतेमुळे खरीप हंगामातील धानासह इतर पिकांवरही विविध प्रकारचे रोग व किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. गेल्या १५ ते २० दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत नसून उष्णतामानही प्रचंड वाढले आहे. त्यामुळे धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पावसाने मारली दडी रोवणीची कामे थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 1:07 AM
१६ जुलै रोजी चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात मुसळधार पाऊस झाला. त्यावेळी पूर परिस्थितीमुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. मात्र त्यानंतर तब्बल २० दिवसांचा कालावधी उलटूनही पाऊस झाला नाही. मधात दोनदा अल्पसा पाऊस झाला. त्यानंतर पावसाने कायमची दांडी मारली.
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा : ३० टक्के रोवणी अद्यापही शिल्लक