कुलगुरूंचे प्रतिपादन : गोंडवाना विद्यापीठात एक दिवसीय कार्यशाळागडचिरोली : गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक आहे. स्त्रियांमध्येही व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असून समाजाचे आरोग्य धोक्यात येत आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी गुरूवारी केले. गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात ‘मद्य, तंबाखू व अमली पदार्थ सेवन नियंत्रण’ या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून राज्य उत्पादनशुल्क विभागाचे आयुक्त व्ही. राधा, सर्चचे संचालक डॉ. अभय बंग, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, माजी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित उपस्थित होते. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक वर्षाला तंबाखू व दारूमुळे मोठ्या प्रमाणात पैैशाचा अपव्यय होतो. तंबाखू व दारू सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले असून भविष्यात त्याचे खूप मोठे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतील, अशी भीती डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केली. दोन्ही जिल्ह्यातील दारू व अमलीपदार्थाचे सेवन कमी करण्यासाठी कृती आराखडा मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता यांनी सादर केला. या माध्यमातून व्यसनाधीनता कमी करता येईल, असे त्यांनी प्रतिपादन केले. व्यसनाधीनता नष्ट करण्याची व समाजात योग्य परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता शिक्षणात आहे, याकरिता विद्यापीठ व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतल्यास समाजात सकारात्मक बदल नक्कीच घडून येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नायक यांनी केले. संचालन रासेयो समन्वयक डॉ. नरेश मडावी तर आभार प्रा. शिल्पा आढल्ले यांनी मानले. डॉ. प्रिया गेडाम, प्रा. रजनी वाढई, प्रा. प्रशांत सोनावने, प्रा. प्रीती काळे, डॉ. विवेक जोशी, डॉ. नंदकिशोर माने, सत्यम नरगडे, प्रशांत खंडाळकर, अमोल सोढी, शालू ब्राम्हणकर, अविनाश आसुटकर यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
व्यसनांमुळे समाजाला धोका
By admin | Published: January 14, 2017 12:56 AM