लोकमत न्यूज नेटवर्क कोरची : कोरची बाह्यवळण महामार्गावरील रस्त्यावर अनेक ठिकाणी खूप मोठे खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे अजूनपर्यंत संबंधित विभागाने बुजवले नाहीत. त्यामुळे दररोज या महामार्गावरून मालवाहू ट्रक फसत आहेत. त्यामुळे अनेक तास वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. दरम्यान, त्रस्त झालेल्या ट्रक चालकाने सदर मार्गावरील खड्डे बुजविले.
१६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान छत्तीसगडवरून चंद्रपूरला निघालेला एक मालवाहू ट्रक ह्याच बाह्यवळण रस्त्याच्या खड्यांमध्ये फसला. तेव्हा या मार्गावर २५ ते ३० मालवाहू ट्रकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याला कंटाळून ट्रक चालकच स्वतः रस्त्यावर उतरून पडलेला खड्डा बुजवण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी रस्त्यावर पडलेला अंदाजे दहा ते पंधरा फुटाचा खड्डा दुरुस्त केला आहे.
यानंतर फसलेल्या ट्रकला बाहेर काढण्यासाठी परिसरातील जेसीबी बोलावली असता त्यांनी फसलेला ट्रक बाहेर काढण्यासाठी चार ते सहा हजार रुपयाची मागणी केली असल्याची ट्रक चालकाने सांगितले आहे. सध्या नेहमीच येथे ट्रक फसत असल्याने ते ट्रक बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त भुर्दंड बसत आहे तर काही ट्रकचालक दुसऱ्या ट्रकला दोरी बांधून टोचन करून फसलेला ट्रक काढत आहेत. बाह्यवळणातील महामार्गावरून २४ तास छत्तीसगड ते महाराष्ट्र राज्यात वाहतूक करण्याऱ्या ट्रक चालकांना डोकेदुखी वाढली आहे.
रस्त्याची नव्याने मजबूत बांधणी करावी या मार्गावरून लहान वाहन चालकांनासुद्धा खूप अडचणींचा सामना करून वाहन चालवावे लागत आहे. अनेकदा अपघातही या ठिकाणी घडलेले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने पडलेल्या खड्याची दुरुस्ती न करता नव्याने रस्त्याची मजबूत बांधणी करण्याची मागणी वाहनचालकांसह या भागातील नागरिकांनी केली आहे.