आलापल्ली व अहेरी येथे लावण्यात आलेले निर्बंध येत्या दोन दिवसांत परत घेऊन दुकाने पूर्ववत सुरू करावी, अन्यथा व्यापारी रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करतील, असा इशारा अहेरी व आलापल्ली येथील व्यापाऱ्यांनी गुरुवारी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला.
जनतेच्या बेलगाम वागण्यामुळे सध्या कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. प्रशासन जनतेला कितीही आवाहन करीत असले तरी आजाराचे गांभीर्य कळत नाही. यासाठी कडक निर्बंधाचीच आवश्यकता आहे. परंतु, केवळ व्यावसायिक दुकाने बंद करून कोरोनावर मात करता येणे शक्य नाही. उलट छोटे दुकानदार, हात ठेलेवाले व अन्य व्यावसायिकांचे नुकसान हाेईल. शासनाला कराच्या रूपात जाणारा महसूल बुडेल. त्यापेक्षा यंत्रणेला सशक्त करून जनतेला नियम पाळण्याची सक्ती केल्यास, कोरोना चाचणी केंद्रांची संख्या वाढविल्यास या रोगावर नियंत्रण मिळविता येईल असे जाणकारांचे मत आहे.
बाजारपेठ सुरू करून प्रत्येक दुकानदारांना नियम पाळण्याचे बंधने घालून दिल्यास आता सर्व दुकानदार काटेकोरपणे नियम पाळतील असे सर्वांचे एकमत आहे. त्यामुळे शासनाने रोजगारावर गदा न आणता यातून पर्यायी मार्ग काढावा. मेडिसीन, किराणा, भाजीपाला, डेली निड्स, तसेच बँक व सहकारी ऑफिस या ठिकाणी सगळ्यात जास्त गर्दी होते. परंतु, ही दुकाने वगळण्यात आलेली आहेत. कापड, भांडी, जनरल, हार्डवेअर, आदी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काही लहान व्यावसायिक दररोजच्या विक्रीवर आपली उपजीविका चालवितात. आधीच अनेकांचा व्यवसाय बुडाला आहे. नगर परिषदेच्या ठिकाणी ७० टक्के दुकाने सुरू आहेत. मात्र, ३० टक्के दुकानांना बंधने घालून व्यवसाय करण्यास परवानगी देणे याेग्य आहे काय? दुकानांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतची वेळ द्यावी. तसेच दोन दिवसांत निर्बंध परत न घेतल्यास व्यापारी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा अहेरी व आलापल्ली येथील व्यापारी संघटनेने दिला आहे.