जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक : राष्ट्रीय मानवाधिकार समितीच्या प्रतिनिधी एस. जलजा यांचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शासनातील प्रत्येक योजना आणि निर्णय यांची सांगड पूर्णपणे मानवाधिकाराशीच आहेत. प्रशासन व्यवस्थेत काम करताना मानवाधिकारांची जाणीव ठेवून अधिकारी व कर्मचारी यांनी काम करावे, असे आवाहन राष्ट्रीय मानवाधिकार समितीच्या विशेष प्रतिनिधी एस. जलजा यांनी केले. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात एस. जलजा यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल, अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, सहायक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील महिलांच्या स्थितीसोबतच हुंडाबळी, बालकामगार तसेच बालविवाह प्रथा, जिल्ह्यात असणारी गुन्हेगारी आदींचा आढावा विविध विभागांच्या प्रमुखांकडून त्यांनी घेतला. जिल्ह्यातील ८० टक्के भाग हा पेसात येतो. त्याखेरीज जिल्ह्यात वनहक्क पट्टे देण्याचे काम ३१ हजारांपर्यंत झाले आहे. याबाबत त्यांनी या बैठकीत समाधान व्यक्त केले. वन हक्कांसोबत सर्वांना ग्रामसभेशी सांगड घालून योजनांचा लाभ द्या, असे जलजा म्हणाल्या. लग्न लागण्याचे मुलीचे वय आणि जिल्ह्यातील आदिवासी समाजातील परंपरा यांची माहिती त्यांनी यावेळी घेतली. लग्नानंतर काही हुंड्याच्या समस्या असतील तर अशा कुटुंबांमधील वाद ग्रामसभेसमोर मांडण्यात यावे जेणे करुन हुंडाबळीसारख्या घटना घडणार नाहीत, असे त्यांनी यावेळी सांगितले. नक्षलवादापासून परावृत्त करण्यासाठी शासनाने शरण येणाऱ्यांसाठी जी आत्मसमर्पण योजना सुरु केली, त्याची माहिती घेण्यासोबतच अशा व्यक्तींचे पुनर्वसन आणि इतर बाबींचा आढावा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी यावेळी सादर केला. अधिकारी आणि कर्मचारी यांनी काम करताना मानवाधिकाराची जाणीव ठेवून काम करावे, असेही आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
मानवाधिकारांची जाण ठेवून प्रशासनाने काम करावे
By admin | Published: May 18, 2017 1:41 AM