निवेदनात म्हटले की, शासन निर्णय २८ मे २०२१च्या अनुषंगाने इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी आवेदन केलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना इयत्ता ९ वीचे ५० टक्के गुण व १० वीचे अंतर्गत व इतर मिळून ५० टक्के गुण ग्राह्य धरून मूल्यांकनाची पद्धत ठरलेली आहे. त्यानुसार २०२०-२०२१ मध्ये महाराष्ट्र बोर्ड, सीबीएससी बोर्ड व इतर बोर्डाच्या इयत्ता १० वी परीक्षार्थ्यांची संख्या ही अंदाजे १७ लाखांच्या जवळपास आहे. २०२०-२०२१ मध्ये महाराष्ट्र बोर्ड पॉलिटेक्निक व आयटीआयमध्ये प्रवेश क्षमता ही २२ लाख होती. वरील संख्येचा विचार केल्यास अकरावी प्रवेशीत विद्यार्थी संख्या ही अंदाजे परीक्षार्थ्यांची संख्या यामध्ये ५ लाखांचा फरक आहे. याचाच अर्थ उपलब्ध विद्यार्थ्यांच्या तुलनेत उपलब्ध जागांची संख्या जास्त आहे.
चालू सत्रात इयत्ता ११ वीच्या बहुसंख्य तुकड्या, तसेच काही शाळा बंद होऊ शकतात. जे विद्यार्थी ग्रामीण भागातील ऑनलाईन शिक्षण घेऊ न शकल्यामुळे दुरावले व इतर तांत्रिक अडचणींमुळे आवेदन भरू शकले नाहीत; परंतु ९ वीची परीक्षा उत्तीर्ण आहेत, अशा विद्यार्थ्यांनासुद्धा चालू शैक्षणिक वर्षात अकरावीत प्रवेश दिल्यास सोयीचे होऊ शकते. यासाठी शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करून ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार यांनी केली आहे.