लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : टिपागड पहाडाच्या कुशीत वसलेल्या मोठा झेलिया या गावातील सरपंचाची १५ वर्षांपूर्वी नक्षल्यांनी हत्या केली होती. त्यानंतर या गावच्या एकाही व्यक्तीने सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य बनण्याची हिंमत दाखविली नाही. त्यामुळे मागील १५ वर्षांपासून या गावाला सरपंच मिळाला नव्हता. मात्र अधिकाऱ्यांच्या पुढाकारानंतर गांगसाय मडावी या युवकाने सरपंच बनण्याची हिंमत दाखविली. अविरोध निवडून येत तो सरपंच पदावर विराजमान झाला. तब्बल १५ वर्षानंतर गावाला सरपंच मिळाला असून गावाचा विकास लोकशाही पध्दतीने होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे गावकºयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.मोठा झेलिया हे गाव कोरची तालुकास्थळापासून ४० किलोमीटर अंतरावर आहे. धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथूनही तेथे जाता येते. कटेझरीनंतर मोठा झेलियाला जाण्यासाठी रस्ताच नाही. पायवाटेचा आधार घेत गाव गाठावे लागते. गाव घनदाट जंगलाने व्यापले असल्याने या गावात आजपर्यंत नक्षल्यांचीच हुकूमत चालत होती. १५ वर्षांपूर्वी येथील सरपंचाला नक्षल्यांनी पोलिसांचा खबºया ठरवत त्याला ठार केले होते. तेव्हापासून या गावात निवडणूक झाली नव्हती. निवडणूक विभागाच्या नियमानुसार प्रत्येक वेळी निवडणूक जाहीर केली जात होती. मात्र कोणीच अर्ज करीत नसल्याने प्रत्येक वेळी या ठिकाणचे सरपंच व सदस्यांचे पद रिक्त राहत होते.अशातच मागच्या वर्षी पुष्पलता कुमरे या कोरची येथे तहसीलदार म्हणून रुजू झाल्या. त्यांनी सर्वप्रथम अतिदुर्गम गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. मोठा झेलिया, रानकट्टा, पिटेसूर इत्यादी गावांत जाऊन त्यांनी लोकांशी जवळीक साधली. यंदा मार्च महिन्यात त्या गावांत गेल्या होत्या आणि आता २ सप्टेंबरला पुन्हा त्या मोठा झेलिया, पिटेसूरला जाऊन आल्या. त्यांनी गावात २६ सप्टेंबरला ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याचे सांगितले. परंतु नक्षल दहशतीमुळे कुणी उभा राहण्यास धजावेना. तहसीलदार पुष्पलता कुमरे यांना गांगसाय मडावी हा उच्चशिक्षित युवक शेजारच्या टिपागड पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या निहायकल गावात असल्याचे कळले. कुमरे यांनी गांगसाय मडावी याच्याशी चर्चा करुन त्यास सरपंच पदासाठी अर्ज करण्यास प्रवृत्त केले. त्याने अर्ज केला. एकमेव अर्ज असल्याने तो अविरोध निवडूनही आला. गांगसाय मडावी हा एम.ए.बी.एड असून बेरोजगार आहे. आज मडावी हा कोरची तालुक्यातील सर्वात उच्चशिक्षित सरपंच आहे. सात सदस्यीय मोठा झेलिया ग्रामपंचायतीत तीन सदस्य अविरोध निवडून आले आहेत.याच परिसरातील पिटेसूर ग्रामपंचायतची सुद्धा निवडणूक झाली नव्हती. चैनुराम गांडोराम ताडामी यांचा एकमेव अर्ज असल्याने तेही अविरोध निवडून आले.प्रमाणपत्रांअभावी काही जागा रिक्तदुर्गम आदिवासीबहुल भागातील लोक अल्पशिक्षित आहेत. त्यामुळे निवडणूक वा अन्य योजनांसाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि ती कुठून मिळवावी लागतात, याची त्यांना पुरेशी जाणीव नाही. इतर नागरिक अर्ज करण्यास इच्छुक झाले. मात्र त्यांच्याकडे आवश्यक असलेली कागदपत्रे नसल्याने त्यांना निवडून लढता आली नाही. परिणामी मोठा झेलिया गटग्रामपंचायतीमध्ये चार पदे तर नऊ सदस्यीय पिटेसूर ग्रामपंचायतमध्ये दोन पदे रिक्त आहेत. आता इच्छुकांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे लागणार आहे.
१५ वर्षानंतर मोठा झेलिया ग्रामपंचायतीला मिळाला सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:55 PM
टिपागड पहाडाच्या कुशीत वसलेल्या मोठा झेलिया या गावातील सरपंचाची १५ वर्षांपूर्वी नक्षल्यांनी हत्या केली होती. त्यानंतर या गावच्या एकाही व्यक्तीने सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य बनण्याची हिंमत दाखविली नाही. त्यामुळे मागील १५ वर्षांपासून या गावाला सरपंच मिळाला नव्हता.
ठळक मुद्देतीन सदस्य अविरोध : पिटेसूरमध्येही निवडणूक