लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : अहेरी तालुक्यातील कुरूमपल्ली हे गाव अतिशय संवेदनशील आहे. या गावात नक्षल्यांची दहशत असल्याने सरपंच पदासाठी कुणीही नामांकन सादर करीत नव्हते. २० वर्षांपूर्वी जोगी तलांडी हे सरपंच बनले होते. तब्बल २० वर्षांच्या कालावधीनंतर त्यांची मुलगी मैनी जोगी तलांडी ही सरपंच बनली आहे.विकासाला विरोध करणारे नक्षली स्थानिक नागरिकांना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी बनण्यासही विरोध करतात. नक्षल्यांचा विरोध पत्करून पदाधिकारी बनलेल्यांना नक्षल्यांच्या दहशतीचाही सामना करावा लागल्याच्या घटना यापूर्वी जिल्ह्यात घडल्या आहेत. कुरूमपल्ली हे गाव नक्षलग्रस्त भागात मोडते. जंगलाने व्यापलेल्या या गावात नक्षल्यांची दहशत होती. २० वर्षांपूर्वी नक्षल दहशत झुगारून जोगी तलांडी हे सरपंच बनले होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर एकाही व्यक्तीने सरपंच बनण्याची हिंमत दाखविली नाही. सदस्य जरी बनले तरी सरपंच बनण्यास सदस्य तयार होत नव्हते. आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते तथा माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी ग्रामपंचायत सदस्य मैनी जोगी तलांडी हिला मार्गदर्शन करून हिंमत वाढविली. त्यानंतर तिने सरपंच पदासाठी आविसंतर्फे नामांकन अर्ज दाखल केला. शनिवारच्या विशेष सभेत मैनी तलांडी सरपंच तर मासा येरा मडावी हे बिनविरोध निवडून आले.यावेळी ग्रा.पं. सदस्य अमृता झाडे, गीला गावडे, पोचा कुळमेथे उपस्थित होते. निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून नायब तहसीलदार एन. एल. गुरनुले, तलाठी व्ही. एस. कवठी, ग्रामसेवक एस. बी. पुराम हजर होते. त्याचबरोबर जि.प. सदस्य अजय नैताम, पं.स. सभापती सुरेखा आलाम, पं.स. सदस्य भास्कर तलांडे, कमलापूरच्या सरपंच रजनिता मडावी, वट्राचे सरपंच रवी आत्राम, आविसं कार्यकर्ते दिवाकर आलाम, संतोष ताटीकोंडावार, अशोक झाडे, शैलेश कोंडागुर्ले, राजू आत्राम, इरपा तलांडी उपस्थित होते.गावात जल्लोषतब्बल २० वर्षांच्या कालावधीनंतर गावाला सरपंच मिळाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सरपंचाची निवड झाल्यानंतर गावात गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला. सरपंचाच निवडीमुळे गावाच्या विकासाला चालना मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
२० वर्षानंतर कुरूमपल्लीला मिळाला सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 12:31 AM
अहेरी तालुक्यातील कुरूमपल्ली हे गाव अतिशय संवेदनशील आहे. या गावात नक्षल्यांची दहशत असल्याने सरपंच पदासाठी कुणीही नामांकन सादर करीत नव्हते. २० वर्षांपूर्वी जोगी तलांडी हे सरपंच बनले होते. तब्बल २० वर्षांच्या कालावधीनंतर त्यांची मुलगी मैनी जोगी तलांडी ही सरपंच बनली आहे.
ठळक मुद्देआविसंच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला पुढाकार : माजी सरपंचाच्या मुलीने दाखविली हिंमत