गडचिरोली : चामोर्शी तालुक्याच्या कुनघाडा-डोनाळा घाटावरील वैनगंगा नदी पात्रात कुनघाडा रै. येथील करण गजानन गव्हारे (२५) हा १३ नोव्हेंबर रोजी पाण्यात बुडून बेपत्ता झाला होता. चामोर्शी पोलिस आपत्ती व्यवस्थापन चमूसह त्याचा शोध घेत होते. अखेर दोन दिवसानंतर म्हणजेच बुधवारी त्याचा शोध लागला. तळोधी परिसरातील वैनगंगा नदीत त्याचा मृतदेह आढळून आला.
चामोर्शी तालुक्याच्या कुनघाडा रै. येथील युवक करण गव्हारे हा दिवाळी सणानिमित्त एटापल्लीहून स्वगावी कुनघाडा रै. येथे आला होता. तो आपल्या ११ मित्रांसोबत वैनगंगा नदीघाटावर आंघोळ करण्यासाठी गेला. दरम्यान तीन मित्र डोंग्यावर बसले असताना डोंगा बुडायला लागला. याचवेळी एका मित्राने पाण्यात उडी घेतली. त्याला वाचवण्यासाठी करणने पाण्यात उडी घेतली; परंतु तो खोल पाण्यात बुडाला. चामोर्शी रुग्णालयात मृतदेहाचे विच्छेदन करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान तलाठी नितीन मेश्राम, पोलिस पाटील दिलीप शृंगारपवार व चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. तो आईवडिलांसाठी एकुलता होता. त्याच्या पश्चात आईवडील, एक विवाहित बहीण, आजी-आजोबा आहेत.
बोट व ड्रोन कॅमेराची घेतली मदत
सोमवारपासून वैनगंगा नदीत करणचा शोध घेतला जात होता. बोट व ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने त्याचा शोध घेतला जात होता; दोन दिवसांनतर १५ नोव्हेंबरला पहाटे एका मच्छिमाराला तळोधी नदी परिसरात मृतदेह आढळला. त्याने याबाबत माहिती दिल्यानंतर मृतदेह करणचाच असल्याची खात्री करण्यात आली.