लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील पाच वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. यावर्षीही बदली होणार की नाही, अशी शंका कुशंका उपस्थित केली जात असताना २८ मे रोजी बदलीपात्र तसेच विस्थापीत (ज्यांना निवडलेल्या २० शाळा मिळाल्या नाही असे शिक्षक) शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगीन आयडीला प्राप्त झाली आहे. त्यामुळे बदलीपात्र शिक्षकांचा जीव भांड्यात पडला आहे. मात्र सोमवारी रात्री उशीरापर्यंत नावे जाहीर न झाल्याने शिक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.गडचिरोली जिल्ह्याचा जवळपास ८० टक्के भाग नक्षलग्रस्त व दुर्गम आहे. या भागात इतर कर्मचाऱ्यांसह शिक्षक सेवा देण्यास सहजासहजी तयार होत नाही. यामुळे दोन वर्षांपूर्वीपर्यंत शिक्षकांच्या बदलीदरम्यान मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होत होता. ज्याचा पैसा पोहोचला त्याच शिक्षकांची बदली होत होती. तर जे शिक्षक पैसे देऊ शकत नव्हते, असे शिक्षक मागील १० ते १५ वर्षांपासून दुर्गम भागातच अडकून पडले होते. यासाठी वेळोवेळी लढा दिला. मात्र त्याला यश येत नव्हते.मागील वर्षी शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन पध्दतीने थेट मंत्रालयातून करण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिक्षकांकडून माहिती मागितली. मात्र मागील वर्षी बदल्या झाल्या नाहीत. त्यामुळे यावर्षी सुध्दा बदल्या होणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. ८ मे रोजी शिक्षक बदलीची यादी जाहीर करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र आचारसंहिता लागल्याने बदली प्रक्रिया लांबणीवर पडली. पुन्हा बदली होणार की नाही, अशी शंका शिक्षकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र सोमवारी शिक्षकांच्या बदलीची यादी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगीन आयडीला उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत सोमवारी महिला व बाल कल्याण विभाग, पशुसंवर्धन विभाग, पाणी पुरवठा विभाग, पंचायत विभाग व सिंचाई विभागाच्या बदल्या असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी सकाळपासून या बदल्यांमध्येच होते. रात्री उशीरापर्यंत लॉगीन आयडी लॉगीन न केल्याने नेमक्या कोणत्या शिक्षकांची व किती शिक्षकांची बदली झाली हे कळले नाही. मात्र शिक्षक बदलीची यादी प्राप्त झाली आहे, हे निश्चित झाले आहे. आपले नाव या यादीमध्ये आहे किंवा नाही, याबाबत शिक्षक वर्गामध्ये मोठी उत्कंठा दिसून येत होती.दुर्गम भागातील शिक्षकांना दिलासाबदली व्हावी, यासाठी मागील पाच वर्षांपासून दुर्गम भागात कार्यरत असलेले शिक्षक संघर्ष करीत होते. बदलीसाठी शेकडो निवेदने, कित्येक आंदोलने केली. २८ मे रोजी बदली यादी प्राप्त न झाल्यास २९ ला आंदोलन करण्याचाही निर्धार केला होता. मात्र २८ मे ला यादी प्राप्त झाली आहे. यामुळे दुर्गम भागातील शिक्षक सुखावले आहेत. मात्र गडचिरोली व तालुकास्थळाच्या जवळपास मागील कित्येक वर्षांपासून दबा धरून बसलेल्या शिक्षकांचे मात्र धाबे दणाणले आहेत. मात्र या प्रक्रियेत कोणतीच वशिलेबाजी चालणार नसल्याने बदली होईल, त्या ठिकाणी जाण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. त्यामुळे या शिक्षकांना सुध्दा बदली यादीची उत्कंठा वाढली आहे.
अखेर शिक्षकांची बदली यादी प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:15 PM
मागील पाच वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. यावर्षीही बदली होणार की नाही, अशी शंका कुशंका उपस्थित केली जात असताना २८ मे रोजी बदलीपात्र तसेच विस्थापीत (ज्यांना निवडलेल्या २० शाळा मिळाल्या नाही असे शिक्षक) शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगीन आयडीला प्राप्त झाली आहे.
ठळक मुद्देउशिरापर्यंत नावे जाहीर झाली नाही : पाच वर्षांपासून रखडल्या होत्या बदल्या