लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गावातली दारू तर बंद झाली, आता गावातील तंबाखू, खर्रा, नस गुडाखूची विक्री बंद व्हायला हवी, ही जाण ठेवून तालुक्यातील भगवानपूर व्यसनमुक्ती गाव संघटनेकडून गावात सर्रास होणारी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला.गावात सर्रास मिळत असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमुळे गावातील लहान मुले व्यसनांच्या आहारी जाण्याची शक्यता आहे, ही बाब ओळखून भगवानपूरच्या गाव संघटनेने गावातील तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. गावातील खर्रा व इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद व्हावी यासाठी १७ तारखेला बैठक घेण्यात आली. गावात खर्रा नाही मिळाला, तर आपोआप खर्रा खाणे कमी होईल, असे मत महिला व पुरुषांनी व्यक्त करीत गावातील खर्रा दुकाने बंद करण्यासाठी पुढाकार घेतला. २४ एप्रिलपर्यंत सर्व पानठेलेधारकांनी दुकानातील तंबाखूजन्य पदार्थ विकणे बंद करावे, अशी नोटीस व कोटपा, बालसंरक्षण कायद्याची प्रत गाव संघटनेच्या सदस्यांनी सर्व पानठेलेधारकांना व खर्रा, तंबाखू विक्रेत्यांना दिली.यावेळी संघटनेतील मेघराज कोकोडे, मेघना सहारे, तारा गावतुरे, सिंधू कुरुडकार, शेवंता मांदाडे, शांता गेडाम, वैशाली कुमरे, नूतन मोहुर्ले व इतर सदस्य उपस्थित होते. मुक्तिपथ अभियानाच्या गडचिरोली संघटक कीर्ती कांबळे, उपसंघटक मनोज पिसुड्डे व प्रेरक रेवनाथ मेश्राम यांनी याकरिता गावातील महिलांना मार्गदर्शन केले.
दारूनंतर तंबाखू व खर्रा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 1:41 AM
गावातली दारू तर बंद झाली, आता गावातील तंबाखू, खर्रा, नस गुडाखूची विक्री बंद व्हायला हवी, ही जाण ठेवून तालुक्यातील भगवानपूर व्यसनमुक्ती गाव संघटनेकडून गावात सर्रास होणारी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला.
ठळक मुद्दे२४ पर्यंत अल्टिमेटम : भगवानपुरातील महिला संघटनेचा पुढाकार