बोगस बदली प्रकरण : लवकरच चौकशीसाठी नोटीस बजाविण्याची शक्यतागडचिरोली : फेब्रुवारी २०१७ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. या निवडणुकीच्या ऐन तोंडावर विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांपैकी ३२ सदस्यांची २०१३ मध्ये झालेल्या बोगस शिक्षक बदली घोटाळ्यात चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २०१३ मध्ये गडचिरोली जिल्हा परिषदेत नियमबाह्य पध्दतीने २२० शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी यांना हाताशी धरून विविध जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ घेत या बदल्या केल्या होत्या. या बदली प्रकरणात आतापर्यंत गडचिरोली पोलिसांनी सहा जणांना अटक करून त्यांची चौकशी केली. त्यांच्यावर नंतर जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर गडचिरोलीचे ठाणेदार व तपास अधिकारी विजय पुराणिक यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून सात अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी हजर राहावे, असे सांगितले होते. या सगळ्यांचे बयान नोंदविण्यात आले, अशी माहिती आहे. याशिवाय जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी उके व माध्यमिक शिक्षणाधिकारी गेडाम ज्यांच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार होता. त्यांचीही चौकशी करण्यात आली. यांना पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते, अशी माहिती आहे. तसेच तत्कालीन एका उपशिक्षणाधिकाऱ्याचाही मागच्या आठवड्यात बयान नोंदविण्यात आला, अशी माहिती मिळाली आहे. गेडाम हे गडचिरोली जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी पदावर होते. त्यानंतर त्यांची पदावन्नती झाली होती. आता ते नागपूर येथील भिडे हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. या सर्वांचे म्हणणे गडचिरोली पोलिसांनी जाणून घेतले. या संपूर्ण प्रकरणात अधिकाऱ्यांच्या बयानावरून ३२ जिल्हा परिषद सदस्यांचा थेट सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. या सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणात आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर झाला. अधिकारी, कर्मचाऱ्यावर दबाव टाकून बेकायदेशीर कामे करून घेण्यात आले, अशी माहिती पुढे आली आहे. बऱ्याचशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना केवळ एक ते दोन हजार रूपये देऊन इतर सर्व मलिंदा बऱ्याच पदाधिकारी व सदस्यांनी लाटला. ही बाबही स्पष्ट झाली आहे. त्यामुळे आता या बोगस बदली घोटाळ्याचा तपास करणारी यंत्रणा लवकरच जिल्हा परिषद सदस्यांना नोटीस बजावून चौकशीसाठी बोलाविण्याची शक्यता आहे. या बदली घोटाळ्याच्या दरम्यान काही जिल्हा परिषद सदस्यांनी चारचाकी वाहनही खरेदी केले होते, ही माहिती पुढे आली. (जिल्हा प्रतिनिधी)
अधिकाऱ्याच्या चौकशीनंतर ३२ जि.प. सदस्य पोलिसांच्या रडारवर
By admin | Published: November 12, 2016 2:02 AM