अभियंत्याच्या कार्यालयासाठी झाली व्यवस्था तळोधी (मो.) : तळोधी येथील रामपुरी टोलीजवळ ३३ केव्ही वीज उपकेंद्र तयार करण्याचे काम मागील सात वर्षांपासून रखडले होते. मात्र यावर्षी या कामाला गती देण्यात येऊन एप्रिल महिन्यात या पॉवर स्टेशनचे काम पूर्ण झाले व सदर पॉवर स्टेशन सुरू सुध्दा झाले आहे. तळोधी पॉवर स्टेशनमध्ये तळोधी, कुनघाडा रै. व येडानूर फिडर बसविण्यात आले आहे. यापैकी कुनघाडा रै. फिडरच्या वायरिंगचे काम येत्या सात दिवसात पूर्ण होऊन सदर फिडर पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. तळोधी व येडानूर हे दोन फिडर सुरू झाले आहेत. तळोधी येथे वीज उपकेंद्र झाल्यामुळे कमी विद्युत भारामुळे वीज पुरवठा ब्रेक डाऊन होण्याची समस्या मार्गी लागणार आहे. वीज उपकेंद्रात एकूण १३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्य:स्थितीत वरिष्ठ तंत्रज्ञ व आॅपरेटर ही दोन पदे रिक्त आहेत. तळोधी बसथांब्यावर वीज विभागाचे अभियंता कार्यालय होते. या कार्यालयांचेही १७ एप्रिल रोजी नवीन वास्तूमध्ये स्थानांतरण करण्यात आले आहे, अशी माहिती अभियंता सचिन महल्ले यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. या उपकेंद्रात आॅपरेटर रूम, स्टोअररूम या वास्तूंचे बांधकाम करण्यात आले आहे. वीजेबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्या तक्रारींचे लवकरच निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन अभियंता महल्ले यांनी दिले आहे. (वार्ताहर)
सात वर्षानंतर तळोधीत वीज उपकेंद्र सुरू
By admin | Published: April 28, 2017 1:28 AM