लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: ना लोकसभा, ना राज्यसभा, सबसे बडी ग्रामसभा, असं म्हणत गडचिरोली जिल्ह्यातील लहानशा गोडलवाही गावातील गावकऱ्यांनी बुधवारी दारु व तंबाखूच्या विरोधात दंड थोपटले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात पेसा कायदा लागू आहे. त्यानुसार ग्रामसभांना मावा नाटे मावा राज म्हणजे, माझे गाव माझे सरकार, असा दर्जा दिला जातो. या गावातल्या सरकारने व्यसनी पदार्थांच्या विरोधात एकत्र येऊन एल्गार पुकारला आहे. मुक्तपथाच्यावतीने गावात दारुबंदीसाठी सभा घेण्यात आली. या सभेला महिलांची प्रचंड उपस्थिती होती. गावात दारू, तंबाखू, खर्रा बंद करण्याच्या हेतूने प्रयत्न केले जाणार आहेत.यावेळी बोलताना सागर गोतपागर यांनी, आदिवासी संस्कृतीची ओळख दारू किंवा तंबाखू नसून, ती मोहफुलाची असल्याचे सांगितले. मात्र अलीकडे लग्नघरी मोहाच्या झाडाची फांदी रोवण्याआधी पानाचा ठेला सुरू केला जातो असे म्हटले. ही बाब आदिवासी संस्कृतीला संपविणारी असल्याचेही ते पुढे म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनी दारुच्या दुष्परिणामांची चर्चा केली. या सभेत गावातील जवळपास सर्वच नागरिक उपस्थित होते.