वैरागड : यंदा समाधानकारक पाऊस पडत असल्याने चांगले उत्पन्न येईल, अशी आशा शेतकरी बाळगून आहेत; परंतु याच कालावधीत धान पिकावर कडाकरपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. तरीसुद्धा वैरागड परिसरातील राेगांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे व उपविभागीय कृषी अधिकारी नीलेश गेडाम यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधाला भेट देऊन पिकांची पाहणी व निरीक्षण केले, तसेच शेतकऱ्यांना सल्लाही दिला.
सध्या कमी मुदतीच्या धान पिकाला फुटवे येत आहेत. काही गावांमध्ये हलके धान निसवले आहेत. मध्यम मुदतीचे धान गर्भावस्थेत आहेत, तर भारी पिकाला बराच कालावधी शिल्लक आहे. अशा अवस्थेत कडाकरपा, गादमाशी, खोडकिडा, आदी रोगांचा प्रादुर्भाव धान पिकावर हाेऊन ५ ते १० टक्के प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेच कृषी विभागाचा सल्ला घेऊन फवारणी करावी. धान पिकावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाला असल्यास आणि त्यावर लगेच कीटकनाशकाची फवारणी न केल्यास पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान हाेऊ शकते. ही खबरदारी घेऊन शेतकऱ्यांनी वेळीच फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. वैरागड येथे धानपिकावर होणारा किडीचा प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजना याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृतीही करण्यात आली. वैरागड येथे पिकांची पाहणी करताना अधिकाऱ्यांसमवेत कृषी पर्यवेक्षक अविनाश हुपरे, कृषी सहायक के.बी. मडकाम व गावातील शेतकरी उपस्थित होते.
बॉक्स
कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच फवारणी करावी
सध्या धान पिकावर कडाकरपा, खोडकिडा, गादमाशी, तुडतुडे आदी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध असलेली महागडी कीटकनाशके विकत घेऊन परस्पर फवारणी करण्यापूर्वी कृषी विभागाचा सल्ला घ्यावा. कडाकरपा रोगासाठी कार्बनझिम किंवा काॅपरक्लोराईड ५० टक्के दहा ग्रॅम प्रतिपंप पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला मंडळ कृषी अधिकारी वसंत शेंडे यांनी दिला.
120921\img-20210912-wa0165.jpg
फोटो वैरागड येथील धान पिकाची पाहणी करताना उपविभागीय कृषी अधिकारी गेडाम जिल्हा कृषी अधीक्षक पराठे