मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्प कायम रद्द करासिरोंचा : आदिवासी विद्यार्थी संघातर्फे तेलंगणा राज्याच्या मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्पाच्या विरोधात शुक्रवारी सिरोंचा तहसील कार्यालयावर विराट मोर्चा नेण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार दीपक आत्राम यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, मंदा शंकर, जि. प. सदस्य कारू रापंजी, आविसंचे नेते प्रा. दौलत धुर्वे, रवी सल्लम, बानय्या जनगम, रवी बोंगेनी, शाम बेजेनी आदी उपस्थित होते. बीआरओ कॅम्प परिसरातून या मोर्चाला दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात सुरूवात झाली. यावेळी बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या २१ गावांचे हजारो नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. यासह सरपंच, उपसरपंच सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकरूंनी ‘के. सी. आर. हाय हाय, पालकमंत्री मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. त्यानंतर मोर्चा बसस्थानकाजवळील इंदिरा गांधी चौकात पोहोचल्यावर विराट सभेत रूपांतर झाले. यावेळी दीपक आत्राम यांनी उपस्थित मोर्चेकरू नागरिकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सिरोंचाचे तहसीलदार अशोक कुमरे यांनी स्वत: बाहेर येऊन मोर्चेकरूंचे १५ मागण्यांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर तहसीलदाराच्या दालनात माजी आमदार दीपकदादा आत्राम, जिल्हा परिषद सभापती अजय कंकडालवार, प्रा. दौलत धुर्वे यांनी तहसीलदाराशी चर्चा केली. तहसीलदारांनी विविध मागण्यांचे निवेदन शासनाला पोहोचवू असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)
आविसंचा मोर्चा सिरोंचात धडकला
By admin | Published: February 06, 2016 1:25 AM