विरोधी पक्षनेते अजित पवार विदर्भ दौऱ्यावर; गडचिरोलीतील शेतकऱ्यांशी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2022 10:35 AM2022-07-28T10:35:08+5:302022-07-28T11:06:51+5:30
अजित पवार यांनी आज अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट दिली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधला.
गडचिरोली : विरोधी पक्षनेते अजित पवार हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज यांनी (२८ जुलै) गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना भेट दिली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
गेल्या महिनाभरापासून विदर्भात पावसाने हाहाकार उडाला आहे. विदर्भातील विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांत पुराचा फटका बसला. शेकडो एकर शेती पाण्याखाली आली पिकांची नासाडी झाली असून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांनी आज अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट दिली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधला.
धान शेतीसाठीचे मुख्य दोन महिनेच अतिवृष्टी झाल्याने नंतर पिक घेऊनही फार उपयोग होणार नाही. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर येथील जमिनींचे पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे केली.