गडचिरोली : राज्य सरकारच्या योजना दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पोलीस करत आहेत. त्यांची सुरक्षा, चांगले आरोग्य, चांगले राहणीमानासाठी आम्ही प्राधान्याने कार्य करू. अर्थमंत्री या नात्याने आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यासोबतच, नक्षल्यांच्या हल्ल्यात बळी पडणारे पोलीस खबऱ्यांचे कुटुंब उघड्यावर पडू नये म्हणून कुटुंबातील एकाला नोकरी देणार, असल्याचे पवार म्हणाले.
गडचिरोलीत आज पोलीस विभागातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उपमुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील सी-६० जवानांचे कौतुक केले व केलेल्या कामगिरीसाठी त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमानंतर आयोजित पत्रपरिषदेत अजित पवार बोलत होते.
गडचिरोली जिल्ह्यातील प्रतिकुल परिस्थितीत पोलीस जवान काम करताहेत. राज्य सरकारच्या योजना दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम पोलीस करत आहेत. पूर्वी गडचिरोलीत बदली होणे ही शिक्षा वाटत होती, पण आता परिस्थिती बदलली असून अनेक अधिकारी स्वत: बदली येथे मागतात. त्यांच्या आरोग्य, शिक्षणातील अडचणी जाणून घेण्यासाठी आलो, असल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली. यासह अर्थमंत्री या नात्याने आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार असल्याचे पवार म्हणाले.
गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरता विविध योजनांची आखणी सुरू आहे. मोहफुलावरील प्रक्रिया उद्योगासाठी स्थानिक लोकांना प्रोत्साहन देणार, सरकारी भागभांडवलही देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासह जिल्ह्यात रेल्वेलाईन आणि विमान धावपट्टीचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
रोजीरोजीचा प्रश्न महत्वाचा की भोंग्यांचा?
यावेळी राज्यात भोंग्यावरून सुरू असलेला वाद व राज्यातील तापलेलं वातावरण या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले, ''रोजीरोजीचा प्रश्न महत्वाचा की भोंग्यांचा? याचा विचार करावा. मनसे-भाजपची यांची युती आहे की नाही, माहित नाही. पण अशा युती-आघाडी होत असतात, त्या टिकतातच असे नाही'