वन विभागाचे कर्मचारी त्रस्त : सभोवतालच्या गावकऱ्यांना धोका; प्रशिक्षित महावताची कमतरता श्रीधर दुग्गीरालापाठी कमलापूर सिरोंचा वन विभागांतर्गत येत असलेल्या कमलापूर हत्ती कॅम्प येथील अजित नावाच्या हत्तीने ११ जुलैपासून धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. अजितच्या या वागण्यामुळे वन विभागाचे कर्मचारी व परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये एकूण सात हत्ती आहेत. अजित हत्तीचा जन्म ७ जुलै १९९४ साली झाला. या हत्तीने सन २०१० पासून अधूनमधून धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. वर्षातून किमान दोन ते तीनदा तरी आपली दादागिरी चालवित असतो. आजपर्यंत त्याने अनेक वाहनांची तोडफोड केली आहे. कमलापूर दामरंचा मार्गावर अजित दादागिरी करीत असतो. त्यामुळे या मार्गावर त्याची दहशत आहे. २६ मार्च २०१३ रोजी याच अजितने पेंटा आत्राम या महावताला ठार केले. लहान-मोठ्या हल्ल्याच्या अनेक घटना अजितकडून घडल्या आहेत. कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये हत्तींची योग्य काळजी घेण्याबरोबरच त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महावताची कमतरता आहे. त्यामुळेच अजित त्याच्या मनाला वाटेल त्या प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. हत्तींवर उपचारासाठी स्वतंत्र डॉक्टर सुध्दा या ठिकाणी उपलब्ध नाही. त्याचबरोबर चारा कटरचेही अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे हत्तींची देखभाल करताना अडचणी निर्माण होत आहे. हत्तीही कमलापूर कॅम्पची शान आहे. त्यामुळे या हत्तीच्या संगोपणासाठी प्रशिक्षीत वर्ग देण्याची मागणी वरिष्ठ स्तरावर अनेक वेळा करण्यात आली. मात्र याकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. वन परिक्षेत्राधिकारी एस. के. लाड यांना विचारणा केली असता, मागील काही दिवसांपासून हत्तींना काम शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे अजित हा रिकामटेकडा झाला असल्याने तो धुमाकूळ घालीत असावा, जनतेने जंगलात जाऊ नये, असे आवाहन केले. ‘तो’ही घालत होता धुमाकूळ अजितचा पिता महालिंगा हा सुध्दा प्रचंड प्रमाणात धुमाकूळ घालत होता. त्याच्या धुमाकूळामुळे वन विभागाचे कर्मचारी व परिसरातील जनता दहशतीत होती. त्याला वठणीवर आणण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला. मात्र महालिंगाचे धुमाकूळ घालणे बंद झाले नाही. त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून महालिंगाला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. महालिंगाप्रमाणेच अजितसुध्दा वागत असल्याने त्याला सुध्दा महालिंगाप्रमाणेच गोळ्या झाडण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘अजित’च्या दादागिरीची कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये दहशत
By admin | Published: July 15, 2016 1:44 AM