जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल गडचिरोली: अल्पवयीन मुलीच्या भावास खेळण्यास पाठवून आजूबाजूला कुणीही नसल्याची संधी साधून बलात्कार करणाऱ्या आरोपीस गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने आजन्म कारावास व एक हजार रुपए दंडाची शिक्षा मंगळवारी ठोठावली आहे. उत्तम रतिराम राऊत (४८) रा. नैनपूर ता. देसाईगंज असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार आरोपी उत्तम राऊत हा ३ सप्टेंबर २०१५ रोजी पीडित मुलीच्या घरी गेला. यावेळी पीडित मुलगी व तिचा लहान भाऊ घरी होते. आरोपीने लहान भावास खेळण्यासाठी पाठवून आजूबाजूला कुणी नसल्याची संधी साधून पीडित मुलीचे तोंड दाबून घरात नेले. यानंतर जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे पीडित मुलीला रक्तस्त्राव झाल्याने मुलीने आपल्या आईला घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली. पीडित मुलीच्या आईने देसाईगंज पोलीस ठाणे गाठून आरोपी उत्तम राऊत याच्याविरूध्द तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३७६ (२) (एल) ५०६ भादंवी कलम ४, ८ बाल लैंगीक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला ४ आॅक्टोबर रोजी अटक केली. गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांनी पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने साक्षीदारांचे बयाण नोंदवून तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून मंगळवारी २७ डिसेंबर रोजी आरोपी उत्तम राऊत याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच एक हजार रुपए दंड व कलम ५०६ भादंवि अन्वये दोषी ठरवून सश्रम कारावास व एक हजार रुपए दंड ठोठावला आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड. अनिल प्रधान यांनी काम पाहिले. (स्थानिक प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास आजन्म कारावास
By admin | Published: December 28, 2016 2:59 AM