आरमोरी : खरीप हंगामातील धान काढण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी धान काढण्याच्या तयारीत असतांनाच दोन-तीन दिवसापूर्वी झालेल्या अकाली पावसाने आरमोरी तालुक्यातील धानपीक ओले झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना आता ओले झालेले धान जमा करावे लागत आहे. या ओल्या झालेल्या धानाला बाजारातही विकतांना अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर येणार आहे.आरमोरी तालुक्यात शेतकरी धान हे प्रमुख पीक घेतात. खरीप हंगामात पावसाच्या अनियमितपणामुळे यंदा धानाची लागवड उशीरा करण्यात आली. त्यामुळे हलका धान पहिले निघाला. आता अन्य जातीचा धान काढण्याची सुरूवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी धान कापून शेतात पसरून ठेवला. दोन दिवसापूर्वी रविवारी गडचिरोली जिल्ह्यात पाऊस झाला. त्यामुळे शेतात उघड्यावर असलेला धान ओला झाला आहे. आता हा धान मळणी यंत्राने काढायसाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. पाण्यात भिजलेला हा धान बाजारात नेल्यावर त्याला भावही कमी मिळण्याची शक्यता आहे. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला अकाली पावसाने मोठा फटका दिला आहे. धानासोबत काही शेतकरी अन्य पीक घेतात. त्यालाही अकाली पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडणीत सापडला.
अकाली पावसाने धानाला फटका
By admin | Published: November 12, 2014 10:43 PM