संजय तिपाले
गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाने सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी केल्याने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची समीकरणे बदलली आहेत. भाजप व मित्रपक्षांसह महाविकास आघाडीमध्येही उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. लोकसभेकरिता इच्छुक असलेले धर्मरावबाबा आत्राम यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडल्याने उमेदवारीसाठी विद्यमान खासदार अशोक नेतेंना नवा स्पर्धक तयार झाला आहे.
जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला हाेता; पण दहा वर्षांत पक्षाची वाताहत झाली. २०१४ मध्ये तर लोकसभेसह तिन्ही विधानसभा मतदारसंघांत भाजपचा वरचष्मा होता. २०१९ मध्ये अहेरी मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावून धर्मरावबाबा आत्राम यांनी दहा वर्षांच्या खंडानंतर दणदणीत ‘कमबॅक’ केले होते. एक वर्ष शिल्लक असताना त्यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांसोबत भाजप-शिवसेना (शिंदे गट) सत्तेत जाऊन कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
सध्याची राजकीय स्थिती काय (लोकसभा)
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभेवर भाजपचे भाजपचे वर्चस्व असून, अशोक नेते हे सलग दोन टर्म प्रतिनिधित्व करीत आहेत.
सर्वच पक्षांची तयारी, उमेदवारी कोणाला?
लोकसभा : भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)
विधानसभा :
आरमोरी : भाजप, काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)
अहेरी : भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), आदिवासी विद्यार्थी संघ, भारत राष्ट्र समिती
गडचिरोली : भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट)
विधानसभा मतदारसंघांतील राजकीय स्थिती
गडचिरोली : भाजपचे डॉ. देवराव होळी यांची दुसरी टर्म आहे. २०१९ मध्ये काँग्रेसच्या उमेदवार डाॅ. चंदा कोडवते निकटवर्तीय प्रतिस्पर्धी होत्या.
आरमोरी : भाजपचे कृष्णा गजबे या मतदारसंघाचे नेतृत्व करतात, त्यांचीही दुसरी टर्म असून, काँग्रेसचे आनंदराव गेडाम यांचा त्यांनी गतवेळी पराभव केला.
अहेरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम मतदारसंघाचे नेतृत्व करतात. पुतणे व भाजपचे उमेदवार अंबरीशराव आत्राम यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती.
*नेते काय म्हणतात? (महाविकास आघाडी)*
राष्ट्रवादीतील फुटीनंतर काँग्रेसचे नुकसान नव्हे, फायदाच होईल. जिल्ह्यात भाजपविरोधी वातावरण आहे. त्यामुळे लोकसभेसह तिन्ही विधानसभा मतदारसंघांवर आम्ही दावा करू.
- महेंद्र बाम्हणवाडे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
महाविकास आघाडी म्हणून आम्ही तिन्ही पक्ष मिळून बांधणी करू. वरिष्ठ नेतेसुद्धा जोमाने तयारीला लागलेले आहेत. गडचिरोली व आरमोरी विधानसभेवर आमचा दावा असेल.
- वासुदेव शेडमाके, जिल्हाप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
९ वर्षे आम्ही पक्षाबाहेर होतो, आता इथले नेते बाजूला गेल्याने पुन्हा शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी सक्रिय झालो आहोत. पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संघटनबांधणी करू.
- अतुल गण्यारपवार, नेते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
नेते काय म्हणतात? (भापज मित्रपक्ष)
भाजप जिल्ह्यात सर्वात सक्षम पक्ष आहे. जिथे पक्षाची ताकद असेल तेथे निश्चितपणे दावा करू. वाटाघाटीत यावर वरिष्ठ नेते निर्णय घेेतील; पण पदाधिकाऱ्यांच्या भावना श्रेष्ठींना कळविण्यात येतील.
- किशन नागदेवे, जिल्हाध्यक्ष, भाजप
शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे विकासाची भूमिका घेऊन वाटचाल करीत आहेत. उमेदवारीवरून मतभेद होणार नाहीत. वरिष्ठ नेत्यांनी दिलेला आदेश शिरसावंद्य असेल.
- राकेश बेलसरे, जिल्हाप्रमुख, शिवेसना (शिंदे गट)
लोकसभेसह गडचिरोली व अहेरी विधानसभा मतदारसंघावर आम्ही दावा करू. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली संघटनबांधणीचे काम जोमाने सुरू आहे.
- रवींद्र वासेकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)