गडचिरोली : शासकीय काम अन् सहा महिने थांब... ही म्हण प्रसिद्ध आहे. अहेरी येथील उपविभागीय कार्यालयातील लोकांचा अनुभव देखील असाच काहीसा असल्याची ओरड होती. उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी वारंवार तंबी देऊनही कामकाजात सुधारणा न झाल्याने अखेर शिपाई वगळता नायब तहसीलदारांसह एकूण दहा कर्मचाऱ्यांना निलंबित करुन कार्यालयास टाळे लावले. २८ ऑगस्टला ही बेधडक कारवाई करुन उपविभागीय अधिकाऱ्यांनी कामचुकारांना अद्दल घडवली.
अहेरी हे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे गाव आहे. येथील उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी दफ्तर दिरंगाईबाबत कर्मचाऱ्यांना ताकीद दिली होती, पण सोपविलेली कामे वेळेत न करणे, अनेक अर्ज व प्रकरणे प्रलंबित ठेवणे, वरिष्ठांचे आदेश न पाळणे असे प्रकार सुरुच होते, त्यामुळे लोकांमधून तक्रारी वाढल्या हाेत्या. या पार्श्वभूमीवर २८ ऑगस्टला सकाळी ११ वाजता वैभव वाघमारे हे कार्यालयात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने नायब तहसीलदारांसह एकूण १० कर्मचाऱ्यांचा निलंबनाचे आदेश तयार केले व शिपायामार्फत ते बजावले. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना घराचा रस्ता दाखविण्यात आला. शिपाई वगळता सर्वच कार्यालय रिकामे झाल्यावर कार्यालयास टाळे लावण्यात आले. सध्या वैभव वाघमारे हे आपल्या दालनात एकटेच असून बाहेर शिपाई आहे.
कर्तव्यात कुचराई केल्याने शिपाई वगळता सर्वच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यात नायब तहसीलदारांचा समावेश आहे. वारंवार सूचना देऊनही कामकाजात सुधारणा न केल्याने ही कारवाई केली आहे.
- वैभव वाघमारे, उपविभागीय अधिकारी, अहेरी