गडचिराेली : धान उत्पादक नाेंदणीकृत शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपयांचा प्राेत्साहन निधी देण्याचे राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात जाहीर केले हाेते; परंतु काेणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार याबाबत स्पष्टता नव्हती. राज्यभरातील धान उत्पादक शेतकरी संभ्रमात हाेते. मात्र, राज्य शासनाने शुक्रवार २४ फेब्रुवारी राेजी शासन निर्णय काढून नाेंदणीकृत सर्वच शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपये दाेन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचे जाहीर केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील शंका दूर झाली.
केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी याेजनेंतर्गत शेतकऱ्यांना हमीभाव दिला जाताे. विविध पिकानुसार हा दर ठरताे. पूर्व विदर्भातील महत्त्वपूर्ण पीक असलेल्या धानाला २०२२-२३ या वर्षात केंद्र शासनाने साधारण धानासाठी २,०४० तर ‘अ’ दर्जाच्या धानासाठी २,०६० रुपयांचा हमीभाव क्विंटलमागे जाहीर केला हाेता. २०२०-२१ पर्यंत राज्य शासनाकडून प्रतिक्विंटल ७०० रुपयांचा बाेनस दिला जात हाेता; परंतु २०२१-२२ या वर्षात शेतकऱ्यांना १,९४० ते १,९६० रुपये प्रतिक्विंटल केवळ हमीभाव मिळाला. बाेनस मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले हाेते. शेतकरी, लाेकप्रतिनिधी व संघटनांकडून बाेनस देण्याची मागणी सातत्याने जाेर धरू लागली. याचवेळी राज्यात सत्तांतर झाले व युती सरकारने हेक्टरी १५ हजार रुपये प्राेत्साहन निधी दाेन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत देण्याचे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जाहीर केले. त्यानुसार हमीभाव केंद्रांवर धान विक्रीसाठी नाेंदणी करणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना प्राेत्साहन निधी वितरित केला जाणार आहे.
धान विक्री केली असाे वा नसाे
पणन हंगाम २०२२-२३ करिता किमान आधारभूत किंमत याेजनेंर्गत नाेंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता प्रतिहेक्टर १५ हजार याप्रमाणे दाेन हेक्टरच्या मर्यादेत प्राेत्साहन राशी देण्यात येईल. सदर राशीचा लाभ घेण्यासाठी ‘नाेंदणीकृत शेतकरी’ हा निकष पाळला असून संबंधित शेतकऱ्यांनी धान विक्री केली असाे वा नसाे, तरीही त्याला लाभ दिला जाईल. नाेंदणीकृत शेतकऱ्याने केंद्रावर धान विक्री करणे बंधनकारक केले नाही. धान विक्री केली नसेल तरीही त्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल.
५ लाख शेतकऱ्यांसाठी १ हजार काेटी
पूर्व विदर्भासह राज्यातील नाेंदणीकृत एकूण ५ लाख धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने १ हजार काेटी रुपये निधी मंजूर केला आहे. खरीप पणन हंगाम २०२२-२३ साठीच हा निधी शेतकऱ्यांना थेट बॅंक खात्यात वितरीत केला जाणार आहे.