आलापल्ली येथील पथदिव्यांचे विद्युत बिल १ काेटी २३ लाख रुपये आहे. मागील दहा वर्षांपासून पथदिव्यांचे वीज बिल थकीत आहे. १५ दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली, संवर्ग विकास अधिकारी अहेरी, वीज वितरण कार्यालय आलापल्ली यांना निवेदन देऊन पथदिवे सुरू करण्यासाठी मागणी केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्यामुळे हे बिल कसे भरायचे? याबाबत तसेच येथील ग्राम विकास अधिकाऱ्याचा प्रभार ग्रामसेविका संध्या गेडाम यांच्याकडे असून त्यांच्याकडे २ ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे ग्रामसेविका संध्या गेडाम नियमित कार्यालयात उपस्थित राहत नाही. त्यामुळे येथे पूर्ण वेळ ग्राम विकास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती केली. परंतु दोन्ही कार्यालयाकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर शुक्रवारी सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद आकनपल्लीवार, सदस्य पुष्पा अलोणे, सोमेश्वर रामटेके, स्वप्नील श्रीरामवार, शंकर बोलुवार, अनुसया सप्पीडवार, माया कोरेत, संतोष अर्का आदी सदस्यांनी ग्रामपंचायतच्या कार्यालयात कामकाज न करता पोर्चमध्ये बसून दिवसभर लोकांच्या अडचणी जाणून प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला.
बाॅक्स
अवैध धंदे वाढण्याची शक्यता
आलापल्ली येथील पथदिव्यांची वीज खंडित केल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे. पथदिवे बंद असल्यामुळे गावात चोरी, अवैध धंदे आणि अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. जोपर्यंत ग्रामपंचायतीच्या पत्राची दखल घेऊन बंद पथदिवे सुरू केले जात नाही. तसेच स्थायी ग्राम विकास अधिकाऱ्याची नियुक्ती हाेत नाही, तोपर्यंत आम्ही कार्यालयात न बसता पाेर्चमध्ये बसूनच काम करणार, असा पवित्रा पदाधिकाऱ्यांचा आहे, असे सरपंच शंकर मेश्राम यांनी लोकमतला सांगितले.