गडचिरोली : जिल्ह्यात १६९ पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया नुकतीच पार पडली. या भरती प्रक्रियेच्या परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. या भरती प्रक्रियेत आपल्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप दहा महिला उमेदवारांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनही दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात पोलीस शिपाई पदासाठी दहाही उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज सादर केला होता. संपूर्ण प्रक्रियेत शारीरिक क्षमता चाचणी व लेखी परीक्षेत चांगले गुण आम्हाला मिळालेले आहे. आम्हाला महिला ३० टक्के आरक्षण व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र नसल्याची सबब सांगून भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आला आहे. ही बाब आमच्यावर अन्याय करणारी असल्याने संबंधित भरती प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करून आम्हाला न्याय देण्यात यावा, अशी मागणी अन्यायग्रस्त उमेदवारांनी केली आहे. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना विचारणा केली असता, महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर संबंधित उमेदवाराकडे नॉन क्रिमीलेअर सर्टीफिकेट असणे आवश्यक आहे. याबाबतचा शासन निर्णय आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या महिला उमेदवारांनी अर्ज भरताना महिला आरक्षणावर होय असे क्लिक केले नाही. त्या महिला उमेदवार ओपनमध्ये गेल्या आहेत. ओपनच्या जागा सर्वांसाठी खुल्या राहतात. त्या महिला उमेदवारांची स्पर्धा पुरूष उमेदवारांसोबत झाली आहे, असे ते म्हणाले. (नगर प्रतिनिधी)
पोलीस भरती प्रक्रियेत दहा उमेदवारांवर अन्याय झाल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2017 1:10 AM