गडचिरोली : तलाठी व वनरक्षक भरतीत ओबीसी बांधवांवर अन्याय होत असल्याने स्थगिती देण्याची मागणी येथील भाजपचे आमदार डॉ.देवराव होळी यांनी विधानसभेत केली. यासंदर्भात एका आदिवासी तरुण मतदाराने त्यांना संपर्क करुन विचारणा केल्यावर 'तुझ्या एका मताने निवडून येतो का?' असे उलट उत्तर दिल्याच्या संभाषणाची आमदार डॉ. होळी यांची कथित ऑडिओ क्लिप १९ जुलै रोजी समाजमाध्यमात व्हायरल झाली आहे. दरम्यान, आमदार होळी यांनी आरोप फेटाळून लावले असून आपण आदिवासींच्या विरोधात नसल्याचा खुलासा केला आहे.
जिल्ह्यात पेसा कायदा लागू आहे. तलाठी व वनरक्षक भरतीत पेसा कायद्यामुळे जागा घटल्याचा ओबीसींचा दावा आहे. पेसा क्षेत्राचे पुनसर्वेक्षण करुन अन्याय दूर करावा, अशी ओबीसी संघटनाची मागणी आहे. या मागणीच्या अनुषंगाने पदभरतीला तत्काळ स्थगिती देऊन २८ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार पदभरतीची प्रक्रिया राबवून ओबीसी समाजावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी विधानसभेत केली.
या मागणीच्या अनुषंगाने एका आदिवासी मतदार तरुणाने डॉ. होळी यांना संपर्क केला. तुम्ही अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघातून निवडून आलात, संपूर्ण भरतीच स्थगित करण्याची मागणी कशी काय करता, यामुळे आदिवाींवर अन्याय होत असल्याचे तो मतदार सांगत होता. यावर तुझ्या एका मताने निवडून आलो का, अशा शब्दांत आमदार डॉ. होळी यांनी त्यास उत्तर दिल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या तरुणाला आमदारांनी नाव विचारले असता त्याने सांगण्यास नकार दिल्याचेही या संभाषणात स्पष्ट होत आहे.
तलाठी व वनरक्षक भरतीत ओबीसी बांधवांवर अन्याय होत असल्याचा सूर आहे. बिंदूनामावलीनुसार रिक्त पदे भरली जावीत, शिवाय पेसा कायदा लागू असला तरी कोणत्याही समुदायावर विनाकारण अन्याय नको म्हणून ही पदभरती स्थगितीची मागणी केली होती. मी आदिवासी बांधवांच्या विरोधात नाही. विरोधकांचे हे षड्यंत्र आहे.
- डॉ.देवराव होळी, आमदार गडचिरोली