पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत शालेय गणवेशासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. हा निधी जुलै महिन्यात शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर टाकला जात होता. मात्र, यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे शाळांना निधीसुद्धा उपलब्ध करून दिला नाही. आता मात्र शाळा सुरू होण्याची शक्यता असल्याने निधी मंजूर करण्यात आला हाेता. समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला दाेन गणवेश उपलब्ध करून दिले जात हाेते. मात्र, यावर्षी काेराेनामुळे पहिले सत्र संपूनही शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे एकाच गणवेशासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी २४ कोटी ९ लाख ९७ हजार रुपयांच्या निधीची गरज होती. त्यापैकी अर्धा म्हणजेच १२ कोटी ४ लाख ९९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. काेराेनाचा प्रभाव घटत चालला आहे. त्यामुळे आता पहिली ते चवथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश कधीही प्राप्त हाेऊ शकतात. तसेच शाळेला निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे काही मुख्याध्यापकांनी दुकानदारांकडे गणवेशांची ऑर्डर दिली आहे. तर शाळांमध्ये गणवेश खरेदी केले आहेत. शाळा सुरू करण्याचे निर्देश कधी प्राप्त हाेतात, याकडे शिक्षक विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.