चामोर्शी तालुक्यात एकाच दिवशी कारवाई : पाच दारू विक्रेत्या आरोपींना अटकगडचिरोली : चामोर्शी व आलापल्ली हे अवैध परप्रांतीय दारू तस्करांचे केंद्र झाल्याचे वृत्त लोकमतमध्ये शुक्रवारी प्रकाशित होताच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने आष्टी येथील वैनगंगा नदीचा पूल व जयरामपूर येथे धाडी घालून १४ लाख ६८ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने चामोर्शी तालुक्यात दारू विक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. शुक्रवारी आष्टी येथील वैनगंगा नदीच्या पुलाजवळ सतीश शंकर येलमुले (२९) व राहूल अंबादास सिलेवार (३३) रा. आष्टी या दोघांकडून १५ हजार रूपये किमतीची गोवा व्हिस्की १५० निपा दारू व ५० हजार रूपये किमतीची दुचाकी मोटार सायकल व दारू विक्रीतून आलेले रोख ४ हजार ३४० असा एकूण ६ लाख ९३ हजार ४०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला तर चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर येथील अमित लक्ष्मण गोटपत्तीवार, विलास सुधाकर चिंचोडकर रा. जयरामपूर, चंद्रय्या भुमय्या गडमवार रा. कुरूड यांच्याकडून ३ लाख ३० हजार रूपयांची गोवा व्हिस्की ३ हजार ३०० निपा व जिप्सी फाईन व्हिस्कीच्या ४५० निपा व दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेली चार लाख रूपये किमतीची पीकअप चारचाकी वाहन असा ७ लाख ७५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणात मिळून १४ लाख ६८ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल व दारूसाठा जप्त करण्यात आला. आरोपींवर मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला.
वाहनासह साडेचौदा लाखांचा दारूसाठा जप्त
By admin | Published: February 06, 2016 1:24 AM