लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाच्या संकटावर मात करीत नववी ते बारावीचे वर्ग जिल्ह्यात सुरू झाले आहेत. त्यानंतर आता राज्य शासनाच्या निर्णयानुसार पाचवी ते आठवीचेही वर्ग सुरू केले जाणार आहेत. यासंदर्भात जि.प.च्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने पूर्वतयारी सुरू केली असून साेमवारी सर्व शाळांना याबाबतचे पत्र पाठविण्यात आले आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव सादर केला हाेता. ताे मान्य झाला असून २७ जानेवारीपासून हे वर्ग सुरू करण्याचे आदेश निघाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जि.प.प्रशासनाने या वर्गाच्या शाळा उघडण्यासाठी पूर्व तयारी सुरू केली आहे.
२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा झाल्यानंतर २७ जानेवारीपासून जिल्हा परिषदेसह नगरपालिका, खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, विनाअनुदानित तसेच सर्व माध्यमांच्या शाळांमधील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी आर.पी.निकम यांनी लाेकमतशी बाेलताना दिली. माध्यमिक शाळांसाठी जसी व्यवस्था केली तशीच प्राथमिकमध्ये करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
९ ते १२ वी वर्गात ५५ टक्के विद्यार्थी उपस्थिती
गडचिराेली जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग दीड महिन्यापूर्वी सुरू झाले. या वर्गात सर्व शाळा मिळून जिल्हाभरात एकूण ४६ हजार ९१२ विद्यार्थी आहेत. सद्य:स्थितीत २३ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची शाळांमध्ये उपस्थिती असून या उपस्थितीची टक्केवारी ५५ इतकी आहे. सुरुवातीला या माध्यमिक वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी हाेती. शाळा सुरू झाल्यानंतर १५ दिवस २० ते २५ टक्केच विद्यार्थी हजर राहत हाेते. मात्र दर हप्त्याला उपस्थित विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली. प्राथमिक वर्ग सुरू झाल्यानंतर माध्यमिक वर्गातील विद्यार्थी उपस्थिती आणखी वाढणार आहे.
काेट...
काय म्हणतात पालक...
ऑनलाईन शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष शाळेतील शिक्षण कधीही चांगले आहे. फक्त शाळांनी काेराेनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे गरजेचे आहे.
- भाऊराव मुनघाटे
महिनाभरापूर्वी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. शाळा व प्रशासनाने काेराेनाबाबत याेग्य खबरदारी घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे पाचवी ते आठवीचे वर्गही उत्तमरीत्या सुरू राहू शकतात.
- चंद्रकांत वाघरे
शाळा बंद असल्याने बहुतांश मुले, मुली, खाेडकर झाली आहेत. ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू असले तरी त्यात फरक आहे. मुलांमध्ये बेशिस्तपणा आला आहे.
- प्रकाश शेंडे
काेट...
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर सदर वर्ग सुरू हाेणाऱ्या प्रत्येक शाळेत हॅन्डवाॅश स्टेशन, सॅनिटायझर आदींची व्यवस्था करण्यात येणार आहे. जि.प.शाळांमध्ये व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीवर आहे. न.प.शाळेत नगर पालिका प्रशासन तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये संबंधित संस्थेवर ही व्यवस्था करण्याची जबाबदारी आहे.
- आर.पी.निकम, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प.गडचिराेली