आंबेडकर भवन पाडल्याचे प्रकरण : मुंबईच्या मोर्चात सहभागी व्हा गडचिरोली : २५ जून २०१६ रोजी मुंबईमधील दादर स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाची तोडफोड केल्याच्या प्रकरणावरून जिल्ह्यातील आंबेडकरवादी नेते व कार्यकर्त्यांनी रविवारी जाहीर सभेत शासनाचा निषेध केला. विविध आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने रविवारी येथील सभागृहात निषेध सभा घेण्यात आली. या सभेला भारीपचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, बहुजन युवा मंचचे डॉ. कैलाश नगराळे, प्रा. डॉ. पंडीत फुलझेले, प्रभू राजगडकर, हिरालाल येरमे, भाकपाचे डॉ. महेश कोपुलवार, नासीर जुम्मन शेख, भारतीय बौध्द महासभेचे सी. पी. शेंडे, दर्शना मेश्राम, प्रणिता रायपुरे उपस्थित होते. याप्रसंगी रोहिदास राऊत, डॉ. कैलाश नगराळे व इतर पदाधिकाऱ्यांनी डॉ. आंबेडकर भवन पाडल्याच्या घटनेचा भाषणातून निषेध केला. या संदर्भात १९ जुलै रोजी मुंबई येथील संघर्ष मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जगन जांभुळकर, प्रास्ताविक महेश राऊत तर आभार माला भजगवळी यांनी मानले.
आंबेडकरवाद्यांनी केला शासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2016 2:13 AM