लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड तालुका स्थळापासून १६ किमी अंतरावर असलेल्या मिरगुडवंचा येथील गरोदर महिलेला प्रसूतीसाठी रूग्णालयात भरती करायचे होते. मात्र गावादरम्यान असलेल्या नाल्यात पाणी असल्याने रूग्णवाहिका गावापर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे तिचे कुटुंबिय व गावातील नागरिकांनी तिला खाटेवर आणून नाला पार केला. त्यानंतर रूग्णवाहिकेने हेमलकसा येथील लोकबिरादरी रूग्णालयात भरती करण्यात आले. तिची प्रसूती झाली असून बाळ व माता सुखरूप आहे.मिरगुडवंचा येथील बाली आकाश लेखामी हिला शनिवारी प्रसववेदना सुरू झाल्या. गावातील आशावर्कर प्रज्ञा दुर्वा हिने आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन गावापर्यंत रूग्णवाहिका आणावी, अशी विनंती वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली. मिरगुडवंचा हे गाव भामरागड तालुका स्थळापासून १६ किमी अंतरावर आहे. या गावापासून दीड किमी अंतरावर एक नाला आहे. या नाल्यावर पूल नाही. तसेच नाल्यात पाणी असल्याने रूग्णवाहिका गावापर्यंत पोहोचविणे अशक्य असल्याची बाब डॉ. विजय मडावी यांनी महिलेला सांगितली. रूग्णवाहिका चालक पिंटूराज मंडलवार यांनी नाल्याच्या अलिकडेपर्यंत रूग्णवाहिका नेऊन ठेवली. गावापासून नाल्यापर्यंत महिलेला खाटेवर आणण्यात आले. रूग्णवाहिकेने आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला हेमलकसा येथील दवाखाण्यात भरती केले. डॉ. अनघा आमटे यांनी प्रसुती केली.पुलांअभावी तुटतो संपर्कभामरागड तालुका जंगलाने व्यापला आहे. या घनदाट जंगलात आदिवासींची लहान लहान गावे आहेत. गावाला जाताना नदी,नाले पडतात. या नाल्यांवर पुलांचे बांधकाम झालेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात येथील नागरिकांचा संपर्क तुटून जीवन खडतर बनते. मूलभूत गरजाही पूर्ण करताना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच एखाद्याची अचानक प्रकृती बिघडल्यास त्याचा जीव गेल्याशिवाय राहत नाही.रुग्णालयात जनजागृतीचा अभावघरी प्रसुती करणे धोकादायक आहे. त्यामुळे प्रसुती दिनांकाच्या काही दिवसाअगोदर गरोदर महिलेला रूग्णालयात भरती करून घेण्याचे निर्देश आहेत. मात्र याचे पालन आरोग्य यंत्रणा करीत नाही. तसेच दुर्गम भागातील महिलाही प्रसुतीपूर्वी काही दिवस अगोदर रूग्णालयात भरती होत नाही. रूग्णालयामध्ये प्रसुती होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने जनजागृती करण्याची गरज आहे.
गरोदर मातेच्या प्रसूतीसाठी खाट बनली रूग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 11:51 PM
भामरागड तालुका स्थळापासून १६ किमी अंतरावर असलेल्या मिरगुडवंचा येथील गरोदर महिलेला प्रसूतीसाठी रूग्णालयात भरती करायचे होते. मात्र गावादरम्यान असलेल्या नाल्यात पाणी असल्याने रूग्णवाहिका गावापर्यंत पोहोचणे शक्य नव्हते.
ठळक मुद्देमिरगुडवंचाच्या नाल्याने अडविली वाट । प्रसूतीनंतर माता व बाळ सुखरूप