लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच अहेरी राजनगरीतील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडियातून मंत्री धर्मरावबाबा आत्राम व त्यांचे पुतणे व माजी राज्यमंत्री अम्बिशराव आत्राम यांच्या समर्थकांनी एकमेकांवर चिखलफेक केली. यासाठी सूचक संदेश देणारे कार्टून अन् व्हिडीओ बनवून पोस्ट केले. यावेळी समर्थकांमध्ये एकेरी शब्दांत तू तू मैं मैंदेखील झाली.
जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरविणाऱ्या अहेरी मतदारसंघातील लढत लक्षवेधी होण्याची शक्यता आहे. येथे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना महायुतीकडून तिकीट हवे आहे, तर माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनीही उमेदवारीवर दावा केला आहे. भाग्यश्री आत्राम यांनी वडिलांविरोधात बंड करून वेगळी वाट निवडली आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत अहेरीची जागा कोणाला सुटते, यावर लढतीचे चित्र अवलंबून आहे.
तूर्त मंत्री धर्मरावबाबा आत्राम व अम्ब्रिशराव आत्राम यांच्यात जोरदार वाक् युध्द रंगले आहे. अम्ब्रिशराव यांनी मतदारसंघातील रस्ते, पुलांवरून धर्मरावबाबा यांच्याविरुद्ध जाहीर आरोप केले आहेत, तसेच त्यांच्या हेलिकॉप्टर दौऱ्यांवरूनही टीकास्त्र सोडले आहे.
यास धर्मरावबाबा यांनीही साडेचार वर्षे झोपलेल्यांना आता जाग आली, अशा शब्दांत पलटवार करून दुखऱ्या नसीवर बोट ठेवले आहे. त्यानंतर आता दोन्ही गटांकडून एकमेकांना नामोहरम करण्यासाठी सूचक कार्टूनचे अस्त्र वापरण्यात आले आहे. सोशल मीडियात दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये घमासान सुरू आहे. कार्यकर्त्यांमधील या आरोप- प्रत्यारोपाने प्रचारा आधीच राजकारण तापले असून प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत हा वाद आणखी काय काय वळणे घेतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महायुतीतील संघर्ष टिपेला
- दरम्यान, महायुतीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्रित • आहेत. मात्र, अहेरीत आत्राम काका-पुतण्यातून विस्तवही जात नाही. त्यामुळे येथे युतीधर्म न पाळता दोघेही राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी आमने-सामने येणार आहेत.
- २०१४ व २०१९ मध्येही या दोघांमध्ये लढत झाली होती. २०१४ मध्ये नवख्या अम्ब्रेिशरावांनी काका धर्मरावबाबांना पराभूत केले होते, तर २०१९ मध्ये धर्मरावबाबा यांनी अम्ब्रेिशराव यांना अस्मान दाखवले होते.
- आता सामना बरोबरीत असल्याने यावेळी काय होणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. तूर्त महायुतीतील तसेच आत्राम राजपरिवारातील काका- पुतण्यातील राजकीय संघर्ष टिपेला पोहोचल्याचे चित्र आहे.
नात्यागोत्यांभोवती राजकारण अहेरीच्या राजकारणावर राजपरिवाराचा सुरुवातीपासूनच प्रभाव राहिलेला आहे. काका-पुतणे यांच्यातील दहा वर्षांपासूनच्या संघर्षात आता भाग्यश्री आत्रांच्या बंडाने नवी भर पडली आहे. त्यामुळे यावेळी येथे पिता- कन्या, बहीण- भाऊ असे नात्यागोत्याचे राजकारण रंगण्याची शक्यता आहे.