विलास चिलबुले/ आरमोरीआरमोरी: रानटी हत्तींच्या भीतीने मध्यरात्री सैरावैरा धावत सुटलेल्या कुटुंबातील वृध्द महिला कळपाच्या तावडीत सापडली. हत्तीने पायाखाली चिरडून त्यांना ठार केले. ही हृदयद्रावक घटना २९ डिसेंबरला मध्यरात्री तालुक्यातील शंकरनगर येथे घडली.
कौशल्या राधाकांत मंडळ (वय ६७,रा.शंकरनगर) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या कुटुंबासमवेत शंकरनगर गावालगतच्या जंगलाशेजारील शेतातील घरी राहत. नित्याप्रमाणे २९ डिसेंबरला जेवण करुन कुटुंब झोपी गेले. मात्र, मध्यरात्री रानटी हत्तींचा कळप दाराजवळ आल्याची कुणकुण कुटुंबाला लागली. हत्ती घरे पाडायलाही मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे जीवाच्या भीतीने सर्व जण दुसऱ्या दरवाजाने गावाच्या दिशेने धावत सुटले, पण हत्तींच्या कळपाने कौशल्या यांना वाटेतच गाठले.
त्यांना पायाखाली चिरडून ठार केले. यानंतर कुटुंबीयांनी गावात माहिती दिली. त्यानंतर वनाधिकारी तेथे पोहोचले. हुल्ला टीमच्या सहाय्याने हत्तींना हुसकावून लावले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा परिसरात रानटी हत्तींच्या कळपाने धुमाकुळ घालून पाच घरांचे नुकसान केले हाेते, त्यानंतर वृध्देचा बळी घेतल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
सरत्या वर्षातील चौथा बळी
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रानटी हत्तींचा धुडगूस सुरु आहे. यापूर्वी आरमोरी तालुक्यातील वन परिक्षेत्रात वनविभागाच्या चालकास हत्तींनी चिरडले होते. त्यानंतर शेतातील धानाचे नुकसान होऊ नये म्हणून हत्तींना हुसकावून लावण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांना हत्तींनी ठार केले. गडचिरोली तालुक्यातील दुधना व मरेगाव येथे या घटना घडल्या होत्या.