लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सततच्या पूरपरिस्थितीने बेजार झालेल्या भामरागड तालुक्यातील मरकणार या अतिदुर्गम गावात मदतरूपाने दैनंदिन गरजेचे साहित्य पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चक्क आपल्या खांद्यावर आणि डोक्यावर ओझे घेतले. एवढेच नाही तर डोंग्यातून नदी पार करून चिखलमय वाटेवरूनही पायी प्रवास केला. एरवी एसी केबिनमध्ये राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी दुर्गम भागातील गावकऱ्यांच्या मदतीसाठी घेतलेली ही मेहनत त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीसोबत संवेदनशील मनाचा परिचय देणारी ठरली.जिल्हा परिषद गडचिरोलीच्या सर्व विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून भामरागड पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी निधी गोळा केला होता. त्या निधीतून गावकऱ्यांना लागणारे संसारोपयोगी साहित्य, वस्तू खरेदी करून भामरागड तालुक्याच्या कोटी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या मरकणार या गावी स्वत: जाण्याचे ठरवले. त्या दुर्गम गावाची लोकसंख्या जेमतेम २४५ आहे. पण ते ५५ कुटुंब सततच्या पावसाने बेजार होऊन अतिशय विपरित परिस्थितीत जगत आहे. या गावाला चारही बाजूने नाल्याचे पाणी असल्याने त्या गावापर्यंत मदत पोहचू पोहोचवणे कठीण होते. पण जि.प.च्या अधिकाऱ्यांचा निर्धार पक्का होता. त्यानुसार मंगळवार २४ सप्टेंबरला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या नेतृत्वात त्या गावी मदत पोहचवण्यासाठी निघालेल्या या पथकाने नाल्याच्या पाण्यातून लाकडी डोंग्यावरुन प्रवास केला आणि सर्व साहित्य पलीकडील तिरावर नेले. पण तेथून पुढे गावात जाण्यासाठी धड रस्ताही नव्हता. त्यामुळे चिखलातून वाट काढत सर्व अधिकारी-कर्मचारी आपापल्या डोक्यावर, खांद्यावर साहित्य घेऊन वाटचाल करत त्या गावात पोहोचले.यावळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी विकास सावंत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बुरले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता घोडमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माणिक चौहान, जिल्हा कृषी विकास अधिकारी श्रीशांत कोडप, अभियंता अमित तुरकर, शाखा अभियंता खोकले, भामरागडचे गटविकास अधिकारी महेश ढोके, तालुका आरोग्य अधिकारी मिलिंद मेश्राम, विस्तार अधिकारी देवारे यांच्यासह काही ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी मदत पोहोचवण्यासाठी सहकार्य केले.या साहित्याचे केले वाटपमदत साहित्यात तांदूळ, चना डाळ, तेल, मीठ, बिस्कीट, टोस्ट ब्लँकेट, ताडपत्री आदी साहित्य होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राठोड यांनी यावेळी ग्रामस्थांना दरवर्षी पावसाळ्यात संपर्क तुटण्याची समस्या पुढच्या चार महिन्यात बेली ब्रिज तयार झाल्यानंतर दूर होईल, असा दिलासा दिला. यानंतरही कुठली मदत हवी असेल तर सांगावे आम्ही मदत करू, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. अतिदुर्गम भागातील लोक कोणत्या परिस्थितीत जगतात हे पहिल्यांदाच या भेटीनिमित्ताने जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहता आले.
अन् जि.प.च्या अधिकाऱ्यांनी खांद्यावर घेतले ओझे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 6:00 AM
जिल्हा परिषद गडचिरोलीच्या सर्व विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून भामरागड पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी निधी गोळा केला होता. त्या निधीतून गावकऱ्यांना लागणारे संसारोपयोगी साहित्य, वस्तू खरेदी करून भामरागड तालुक्याच्या कोटी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या मरकणार या गावी स्वत: जाण्याचे ठरवले. त्या दुर्गम गावाची लोकसंख्या जेमतेम २४५ आहे.
ठळक मुद्देचिखल आणि नाल्यातून काढली वाट : दुर्गम मरकणार गावात मदत पोहोचवण्यासाठी करावी लागली कसरत