कुरखेडा (गडचिरोली) : कुरखेडा ते कोरची मार्गावरील लेंडारी येथील एका इसमावर वाघाने हल्ला केला, त्याला जंगलात ओढत नेले अशी माहिती एका अभियंत्याने दिली आणि पाहता पाहता ही वार्ता तालुक्यात अनेकांपर्यंत पोहोचून चर्चेचा विषय झाली. वनविभागाने तातडीने पावले उचलत जंगल पिंजून काढले, पण हाती काहीच लागले नाही. व्हॉट्सॲप आणि चर्चेतून अनेकांपर्यंत पसरलेली ती माहिती अफवा असल्याचे अखेर स्पष्ट झाले.
गुरुवारी सकाळी जांभूळखेडा, लेंडारी परिसरात पट्टेदार वाघ होता हे खरे होते, पण त्याने एका व्यक्तीला उचलून नेले ही मात्र निव्वळ अफवाच होती. वाऱ्यासारख्या पसरलेल्या त्या माहितीला पुराडा वन विभागानेही गांभीर्याने घेऊन जंगलाचा परिसर पिंजून काढला. ज्या भागात वाघाने हल्ला करून एका व्यक्तीला ओढत नेल्याचे सांगितले जात होते, तेथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः जाऊन निरीक्षण केले. पण ‘लांडगा आला रे, आला...’ या उक्तीप्रमाणे ‘वाघाने त्याला नेला रे, नेला...’ अशी निव्वळ बोंब झाली.
पुराडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी दिघोरे यांनी याबाबत मोबाइलवरून बोलताना सांगितले की, घटनास्थळी पट्टेदार वाघ आल्याची खात्री पटली आहे. त्याचे पगमार्क मिळाले आहेत. परंतु वाघाच्या हल्ल्याची कुठलीही खूण आढळली नाही.
अन् वाघासोबत सायकलस्वारही झाला गायब
त्याचे असे झाले की, जांभूळखेडा येथून पुराडाकडे प्रवास करताना एका बांधकाम अभियंत्याला जंगल परिसरातून वाघ मुख्य रस्त्यावर येताना दिसला. सोबतच समोरून सायकलने येणारी एक व्यक्तीही नजरेस पडली. मात्र घाबरलेल्या अभियंत्याने आपले वाहन मागे घेत पळ काढला. थोड्या वेळात वाघ जंगलात निघून गेला असेल असे समजून ते परत त्याच मार्गाने निघाले. मात्र त्यांना सायकलवरून येणारी ती व्यक्ती कुठेच दिसली नाही. त्यामुळे वाघाने त्या सायकलस्वारावर हल्ला करून त्याला जंगलात ओढत नेले, असा ग्रह करून त्या अभियंत्याने लेंडारी येथे पोहोचल्यानंतर ही कहाणी नागरिकांना सांगितली आणि काही वेळातच ही अफवा सर्वत्र पसरली.