वाढीव मानधनाची थकबाकी कायमच : २० ला जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन एटापल्ली/चामोर्शी : वाढीव मानधनाची थकबाकी, मिनी अंगणवाडीचे अंगणवाडी केंद्रात रूपांतर, किमान वेतन आदी मागण्यांवर अंगणवाडी महिला कर्मचारी शासनाविरोधात आक्रमक झाल्या आहेत. अंगणवाडी महिला कर्मचारी संघटनेच्या वतीने २० जानेवारी रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात संघटनेचे राज्यध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांच्या नेतृत्वात एटापल्ली व चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा येथे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. एटापल्ली येथील बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुवर्णा सरकार होत्या. प्रास्ताविकेतून सलेस्तीना कुजूर म्हणाल्या, मिनी अंगणवाडीतील सेविका काम प्रचंड करतात मात्र मिनी अंगणवाडीच्या नावाखाली आम्हाला सेविकेला मिळते, त्यातील अर्धेच मानधन दिले जाते. मिनी अंगणवाडीचे रूपांतर अंगणवाडीत करून आम्हाला न्याय द्यावा, असेही कुजूर म्हणाल्या. प्रा. रमेशचंद्र दहिवडे म्हणाले, मिनी अंगणवाडी सेविकेच्या मानधनात वाढ होऊन तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र मिनी अंगणवाडी सेविकांना जुन्याच दराने मानधन दिले जात आहे. सुधारित दराने मानधन देण्यात यावे, तीन वर्षाच्या काळातील थकबाकी देण्यात यावी, अशी मागणी प्रा. दहिवडे यांनी केली. बैठकीला मोनिका विश्वास, जमना पदा, पूजा गेडाम, जानकी गावडे, वासूकला उईके आदी उपस्थित होत्या. चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा येथील सभेला उज्ज्वला उंदीरवाडे, इंदुमती भांडारकर, भारती रामटेके, ज्योती बेजंकिवार, रंजना चौकुंडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी अंगणवाडी सेविकेच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. ४५ व्या श्रम संमेलनाच्या ठरावाची अंमलबजावणी करून कर्मचाऱ्यांना १८ हजार रूपये इतके किमान वेतन देण्यात यावे, तीन हजार रूपये पेंशन लागू करण्यात यावे, मानधनात वाढ करावी, थकीत टीए बिल देण्यात यावे, अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या रिक्त जागा भरण्यात याव्या आदी मागण्यांसाठी जि. प. धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
अंगणवाडी महिला कर्मचारी आक्रमक
By admin | Published: January 07, 2017 1:29 AM