कमलापूर (गडचिरोली) : परिसरातील पत्तीगाव येथील अंगणवाडी सेविकेचे अपहरण करून तिचे दाेरीने हात बांधून मारहाण करण्यात आली. नंतर तिला जंगलात साेडून देण्यात आले, असे बयाण सदर महिलेने पाेलिसांना दिले आहे. या घटनाक्रमामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सुरेखा सुरेश आलाम (४०) असे अंगणवाडी सेविकेचे नाव आहे. सुरेखा ही राजाराम जवळील काेंकापरी येथील रहिवासी आहे. ती पत्तीगाव येथील मिनी अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे. काेंकापरीपासून पत्तीगाव पाच किमी अंतरावर आहे. ती गावावरून ये-जा करायची. १४ जानेवारी राेजी अंगणवाडीत जाते म्हणून ती घरून निघाली. मात्र सायंकाळ हाेऊनही ती परत आलीच नाही. तिची शाेधाशाेध केली असता ती मिळून आली नाही. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी याबाबतची तक्रार राजाराम उप पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. मात्र ती १५ जानेवारी राेजी सायंकाळी गावाजवळच आढळून आली. तिला तत्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. तिला बीपीचा त्रास असल्याचे निदान झाले आहे. मारहाण झाल्याचा अहवालात उल्लेख नाही.
पाेलिसांनी तिचे बयाण नोंदविले असता ती पत्तीगाव येथे जात असताना तिचे दाेन्ही हात काही जणांनी दाेराने बांधले. तिला मारहाण करून जंगलात साेडून दिले. ती कशीबशी गावापर्यंत पाेहाेचली, असे बयाण तिने पाेलिसांना दिले आहे. मात्र नेमके असे घडले असावे, याबाबत पाेलिसांना शंका आहे. त्यामुळे या प्रकरणाची चाैकशी राजाराम पाेलिस अतिशय दक्षपणे करीत आहेत. पाेलिसांच्या चाैकशीत सत्य काय ते समाेर येईल.
पती व पत्नीच्या बयाणात तफावत
अंगणवाडी महिला मिळून आल्यानंतर तिचे बयाण घेतले. यात तिचे व तिच्या पतीच्या बयाणामध्ये फरक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस पुन्हा दक्षपणे चाैकशी करीत आहेत.