ऑनलाईन लोकमतगडचिरोली : पदवी व पदव्युत्तरचे शिक्षण प्राप्त करूनही अनेक वर्षानंतर नोकरी हाती न लागल्याने बेरोजगारीला कंटाळून जिल्हाभरातील संतप्त एक हजारांवर युवकांनी एकत्र येत मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरूवारी धडक दिली. रोजगार निर्मिती संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.सुशिक्षित बेरोजगार व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समिती जिल्हा गडचिरोलीच्या बॅनरखाली काढण्यात आलेल्या या मोर्चाची सुरुवात स्थानिक इंदिरा गांधी चौकातून झाली. येथून सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारच्या सुमारास पोहोचला. या मोर्चात जयंत पेद्दीवार, मिलींद साळवे, गजानन गोरे, रेशमा गोनाडे, रोहिनी नैताम, पंकज मल्लेलवार, प्रणय घुटके, अमित क्षिरसागर, अमित तलांडे, धामदेव शेरकी, नीलेश राठोड, भैय्या झोडापे, संतोष बोलुवार, शैलेश खरवडे, रितेश अंबादे, देवा मेश्राम, दिवाकर शेंडे, अभिजीत मोहुर्ले, मिलींद साळवे, निखील ठाकूर, शीतल गेडाम आदींसह हजारो बेरोजगार युवक, युवती तसेच सर्व शाखांचे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक सहभागी झाले होते.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला संबोधित केले. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांवर शासनाकडून कशाप्रकारचा अन्याय होत आहे, याचा पाढा वाचण्यात आला. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यासाठी नोकर भरतीचे विशेष धोरण राबविण्याची गरज असताना विद्यमान राज्य सरकारकडून तसे प्रयत्न होत नसल्याने जिल्ह्यात बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असे सांगण्यात आले. जिल्ह्यातील बेरोजगारीच्या समस्येला विद्यमान सरकार, त्यांचे धोरण व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जबाबदार असून त्यांचे या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाषणातून करण्यात आला.मोर्चात सहभागी झालेल्या युवकांनी फलकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा निषेध केला. काही युवकांनी आत्महत्येचा देखावा सादर करून लक्ष वेधून घेतले. सदर मोर्चात जिल्हाभरातील एक हजारांच्या वर युवक, युवती सहभागी झाले होते. विद्यार्थी समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले. निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्वीकारले.या आहेत बेरोजगारांच्या निवेदनातील मागण्यामहाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील १ लाख ७० हजार रिक्तपदे त्वरित भरण्यात यावीत, संयुक्त पूर्व परीक्षा रद्द करून पूर्वीप्रमाणेच स्वतंत्र परीक्षा घेण्यात यावी, जिल्हा निवड पदभरतीवरील बंदी उठवून जागा भरण्यात याव्या, गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीच्या जागा वाढविण्यात याव्या, एमपीएससीने सी-सॅट या विषयाचा पेपर यूपीएससीच्या धर्तीवर पात्र करावा, एमपीएससीने तामिलनाडू पॅटर्न लागू करावा, राज्यसेवेच्या ६९ पदांमध्ये वाढ करण्यात यावी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये चाललेल्या डमी उमेदवारांसारख्या गैरप्रकाराचा प्रकार सीबीआयकडे सोपवावा, स्पर्धा परीक्षा केंद्रावर बायोमॅट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात यावी, परीक्षा केंद्रावर मोबाईल जॅमर बसवावे, जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा निवड मंडळ स्थापन करावे, शिक्षक भरती निवड प्रक्रिया तत्काळ करावी, स्पर्धा परीक्षांमधील बैठक व्यवस्था ही सीसीटीव्हीने सुसज्ज असावी, सर्वच स्पर्धा परीक्षांचे परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे, महिला समांतर आरक्षणाचा मुद्दा त्वरित निकाली काढण्यात यावा, प्रत्येक पदाकरिता प्रतीक्षा यादी लावण्यात यावी, स्पर्धा परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावी, आरक्षित जागेतील स्पर्धा परीक्षेत उमेदवार मेरिटमध्ये असल्यास त्याची निवड खुल्या प्रवर्गातून पूर्वीप्रमाणे करण्यात यावी, आदी मागण्यांचा मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात समावेश आहे.
संतप्त सुशिक्षित बेरोजगार युवकांचा आक्रोश रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:29 AM
पदवी व पदव्युत्तरचे शिक्षण प्राप्त करूनही अनेक वर्षानंतर नोकरी हाती न लागल्याने बेरोजगारीला कंटाळून जिल्हाभरातील संतप्त एक हजारांवर युवकांनी एकत्र येत मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरूवारी धडक दिली.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला : शासन व लोकप्रतिनिधींचा केला निषेध