गडचिरोली : जिल्ह्यातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे शेती कसण्याकरिता लागणारी जनावरे यासह दुधाची गरज भागविण्यासाठी जनावरे आहेत. परंतु जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील एकूण ८१ पदे रिक्त असल्याने जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यात ६३ पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचाही समावेश आहे. परिणमी रिक्त पदांमुळे जिल्ह्यातील पशुचिकित्सा आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडली आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागात पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. परंतु अनेक गावात येण्याकरिता रस्त्यांचा अभाव असल्याने जनावरांवर वेळीच उपचार होऊ शकत नाही. जिल्ह्यात पशुवैद्यकीय श्रेणी- १ चे ९२ दवाखाने आहेत. श्रेणी- २ चे ३९ दवाखाने तसेच ७ फिरते पशुचिकित्सालय आहेत. मात्र या दवाखान्यांमध्ये अनेक संवर्गाच्या कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. पशुधन पर्यवेक्षकांची १२ व पट्टीबंधक कर्मचाऱ्यांची ८ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात एकूण पशुधन विकास अधिकाऱ्यांची ६३ पदे रिक्त असून चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक १२, एटापल्ली व अहेरी प्रत्येकी ९ पदे, धानोरा ७, सिरोंचा ४, कुरखेडा ३, गडचिरोली ६, कोरची व भामरागड प्रत्येकी ७, आरमोरी २, देसाईगंज पं. स. अंतर्गत १ पद रिक्त आहे. अनेक दवाखान्यातील कर्मचाऱ्यांचे जवळपास ५- ६ सहा वर्षांपासून रिक्त आहेत.
रिक्तपदांमुळे पशु आरोग्यसेवा कोलमडली
By admin | Published: August 07, 2015 1:22 AM