प्रशासन अनभिज्ञ : भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातरमेश मारगोनवार - भामरागडभामरागड तालुक्यात अनेक गावाजवळून नदी व नाला वाहत नाही. अशा गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या बिकटच आहे. अशा गावातील नागरिकांनी आपली जनावरे जगविण्यासाठी जंगलात उन्हाळ्याच्या दरम्यान सोडून दिली होती. यातील शेकडो जनावरे जंगलातच मरून पडली आहे. आता पाऊस पडल्यानंतर नागरिक हे जनावरे आणण्यासाठी जंगलात फेरफटका मारत आहे. त्यामुळे ही भीषण परिस्थिती उजेडात आली आहे. १२८ गाव असलेल्या भामरागड तालुक्यात पामुलगौतम, पर्लकोटा, इंद्रावती या प्रमुख नद्या वाहतात. गावालगत नालेही आहेत. परंतु तालुक्यात नदी व नाल्यांच्या किनाऱ्यावर न वसलेली ५० ते ६० च्या संख्येत गाव आहेत. अशा गावांमधील नागरिकांचा प्रमुुख व्यवसाय शेती व पशुपालन आहे. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात अशा गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या बिकट स्वरूपात जाणवते. या गावामंध्ये पाण्याची व्यवस्था म्हणून बोअरवेल आहेत. नागरिक पिण्यासाठी या बोअरवेलचे पाणी वापरतात. मात्र जनावरांना पिण्यासाठी पाणी पाजणे शक्य होत नाही. गावात शेकडोच्या संख्येत जनावरे आहे. त्यांना बोअरवेलचे पाणी काढून पाजतो म्हटले तरी अतिशय कठीण बाब ठरते. त्यामुळे उन्हाळा लागण्याच्यापूर्वी या गावातील नागरिक आपले जनावरे वाचविण्यासाठी जंगलात सोडून देतात. जंगलात पाणवठ्यावर ही जनावरे जगतील, अशी या मागची भूमिका असते. यंदा मात्र कडक उष्णतामानामुळे ही जनावरे जंगलातच मरून गेली आहे. भामरागड तालुक्यात वटेली, बिसामुंडी, गुरूनूर, खंडी नयनवाडी, कुचेर, मरदूर, कोईनार या गावात अशी परिस्थिती असल्याचे लोकमत प्रतिनिधीने या भागाचा दौरा केल्यावर दिसून आले. अनेक नागरिकांनी याबाबत माहिती दिली. आता पाऊस आल्यानंतर जनावरे आणण्यासाठी जंगल परिसरात व सोडलेल्या भागात नागरिक जात आहे. तर जंगलात अनेक जनावरांचे सांगाडे असल्याचे दिसून आले आहे. तालुका प्रशासन मात्र या प्रकाराबाबत पूर्णत: अनभिज्ञ असून याबाबत प्रशासनाला काहीही माहिती नसल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाचे अधिकारी दुर्गम भागात दौरेच करीत नाही. त्यामुळे त्यांना याची जाणीव नाही.
पाण्याअभावी जनावरे दगावली
By admin | Published: June 19, 2014 11:48 PM