गडचिराेली : तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी जाणारी ३३ जनावरे (गाेवंश) विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी ७ वाजता अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली गावाजवळ वाहनासह पकडली. त्यानंतर अहेरी पाेलिसांना माहिती दिली असता पाेलिसांनी वाहनासह जनावरे ताब्यात घेतली.
जिल्ह्यातून टीएस ०१ - यूए १६९८ क्रमांकाच्या मेटॅडाेरमधून गाेवंश तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेले जात हाेते. याबाबतची माहिती विहिंप व बजरंग दलाचे कार्यकर्ते रवी नेलकुद्री, साई तुलसीगिरवार, विनाेद जिलेल्ला यांना मिळाली. त्यांनी वांगेपल्लीजवळ सापळा रचून वाहन अडविले व तपासणी केली असता वाहनात गाेवंश आढळून आले. त्यानंतर याबाबतची माहिती पाेलिसांना दिली. त्यानुसार पाेलिसांनी जनावरांसह वाहन ताब्यात घेतले.
याप्रकरणी रमेश बाकय्या पाेर्ला (३३) व सुनील नागेश मांडवकर (दाेघेही रा. वाकडी, जि. आसिफाबाद, तेलंगणा) यांच्यावर गुन्हा नाेंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत पार पाडली. ही कारवाई ठाणेदार किशाेर मानभाव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय देवीदास मानकर, पाेलिस नाईक माेहन तुलावी, प्रशांत हेडावू, हवालदार किशाेर बांबाेळे यांनी केली.