रमेश मारगोनवार
भामरागड (गडचिरोली) : यावर्षी आठवडाभरापासून तापमानात मोठी वाढ होऊन असह्य उष्णतामान झाले आहे. यामुळे मनुष्यजीवांसह पशुपक्ष्यांनाही जोरदार फटका बसत आहे. जंगलातील व गावालगतचे जलस्रोत कोरडे झाले आहेत. त्यामुळे जंगली व पाळीव जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तहान भागविण्यासाठी गावातील बोअरवेलजवळ पाळीव जनावरे जमत आहेत. कोणी पाण्याचा गुंड भरून नेल्यानंतर खाली टपकणाऱ्या घोटभर पाण्यासाठी या प्राण्यांचा जीव कासावीस होत आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या भामरागड तालुक्यात २०१९ पासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. अधूनमधून तालुक्यात अवकाळी पावसामुळे नदीनाल्यांचे पाणी स्रोत वाढले होते. त्यामुळे यंदा पाणी समस्या कमी जाणवेल असा अंदाज वर्तविला जात असतानाच एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पारा वाढला.
ग्रामीण भागात पाणी टंचाई, चारा टंचाईचे सावट ओढवत आहे. भामरागड तालुक्यात इंद्रावती, पामुलगौतम, पर्लकोटा, बांडिया अशा नदी-नाल्यांची कमतरता नाही. परंतु पाणी जिरवा पाणी अडवा, अशा कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. पावसाळ्यात रुद्रावतार धारण करणाऱ्या पर्लकोटा नदीचा प्रवाह मे महिन्यात दम तोडण्याच्या मार्गावर आहे. यशिवाय काही भागात जमिनीतील पाण्याची पातळी कमी होऊन बोअरवेलमधील पाण्याने तळ गाठला आहे. यामुळे जून महिन्यापर्यंत भयावह परिस्थिती निर्माण होईल, अशी चिंता ग्रामीण भागात दिसत आहे.
या भागात जनावरांच्या मालकांना त्यांची फारसी काळजी नसते. धान कापणी झाल्यानंतर गाय-बैल सोडून देतात. ते जंगलात भटकत असतात. पुन्हा पावसाळा लागला की आपआपले गाय-बैल शोधून आणतात. परिणामी या भागातील पाळीव जनावरांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.
अनेक बोअरवेल पडताहेत बंद
बोअरवेलमध्ये पाणी तळ गाठायला लागल्याने एक गुंडभर पाण्यासाठी दांडा जोरजोरात मारून अनेक बोअरवेल बंद पडल्या आहेत. तालुक्यातील १२८ गावांसाठी एकच बोअरवेल दुरुस्ती पथक आहे. त्यामुळे वेळेवर दुरुस्ती होत नाही. परिणामी पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी दुरुस्ती पथक वाढविणे गरजेचे आहे. पर्याय व्यवस्था म्हणून गावातील विहिरीतील काडी कचरा काढून साफ करण्यासाठी पं.स. प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.