गुंडापल्ली : पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या सुभाषग्राम येथील अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम मागील पाच वर्षांपासून रखडले असल्याने गावातील चिमुकल्यांना इमारतीअभावी अंगणातच उन्ह, वारा, पावसात बसावे लागत आहे. प्रशासनाचे अंगणवाडीच्या बांधकामाकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. सुभाषग्राम येथील लोकसंख्या तीन ते साडेतीन हजारच्या आसपास आहे. गावातील बहुसंख्य लोकसंख्या बंगालीबहूल आहेत. गावात ८० च्या आसपास बालक अंगणवाडीत दाखल करण्यात आले आहेत. गावातील बालकांसाठी अंगणवाडीची व्यवस्था व्हावी म्हणून २००९ मध्ये अंगणवाडी केंद्राच्या बांधकामास ८ लाख ८४ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला व सदर अंगणवाडी केंद्राचे बांधकाम सुरू करण्यात आले. सुभाषग्राममध्ये गटग्रामपंचायत असल्याने सदर अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाचे कंत्राट एका कंत्राटदाराला देण्यात आले. परंतु बांधकामातील मजुरांची मजुरी न दिल्याने कंत्राटदाराने अंगणवाडी केंद्राचे बांधकाम अर्धवट सोडून दिले. तेव्हापासून अंगणवाडी केंद्राचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. संबंधीत अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी पंचायत समिती तथा जिल्हा परिषदकडे अनेकदा करण्यात आली. शिवाय ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही अंगणवाडीचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. परंतु याकडे संबंधित विभागाने पूर्णत: दुर्लक्ष केले. त्यामुळेच गावातील ८० विद्यार्थ्यांना उन्ह, वारा, पावसात अंगणात बसावे लागत आहे. बालकांसाठी पोषण आहार शिजविण्याचे कामही अंगणातच केले जात असल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
इमारतीअभावी चिमुकल्यांची अंगणवाडी मैदानातच!
By admin | Published: November 06, 2014 10:55 PM